देशमुखांची दिवाळी तुरुंगातच! ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

मुंबई,२ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- मनी लॉन्ड्रिंगप्रकणी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (७१) यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे देशमुख यांची संपूर्ण दिवाळी तुरुंगात जाणार असून मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी कोठडी सुनावण्यात आल्याने देशमुखांसह राष्ट्रवादीलाही हा मोठा धक्का मानला जात आहे.

अनिल देशमुखांनी यापूर्वीच एक व्हीडिओ प्रकाशित करत त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. मी न्यायालयापुढे हजर झालो मात्र, परमवीर सिंह गायब आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने सोमवारीच (ईडी)अटक केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी झाली. मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. अनिल देशमुख हे त्यांच्या वकिलांसोबत सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. यावेळी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले होते.
 
 
काही दिवसांपासून फरार असलेले अनिल देशमुख हे सोमवारी प्रथमच समोर आले. दिवसभर देशमुखांची चौकशी झाली आणि संध्याकाळी ७.३०च्या सुमारास दिल्लीतील काही अधिकारी ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर पुन्हा देशमुख यांची चौकशी झाली आणि अखेर रात्री उशिरा त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रींग व खंडणी वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात अनिल देशमुख हे गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या चौकशीच्या रडारवर होते.
 
 
 
मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्याशिवाय, त्यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचाही आरोप होता. या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला लक्ष्य केल्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीनं त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली होती.