कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या विविध उपाययोजनांसाठी ५६ कोटी ४ लाख ८३ हजार रुपयांचा निधी वितरित – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई,२ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-  कोविड – १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्त कोकण,विभागीय आयुक्त  पुणे, विभागीय आयुक्त नागपूर, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना एकूण ५६ कोटी ४ लाख ८३ हजार रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, कोविड – १९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधींची मानके व बाबीनुसार करावयाचा खर्च भागविण्याकरिता  विभागीय आयुक्त नागपूर, कोकण, औरंगाबाद व पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिफारशी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या बाबी विचारात घेत राज्य कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्त नागपूर, कोकण,औरंगाबाद व पुणे यांच्यामार्फत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना रुपये ५६ कोटी ४ लाख ८३ हजार रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

यामध्ये विभागीय आयुक्त कोकणसाठी २६ कोटी ७३ लाख ७९ हजार रुपये, विभागीय आयुक्त पुणेसाठी १२ कोटी ७६ लाख १४ हजार रुपये,  विभागीय आयुक्त औरंगाबादसाठी ११ कोटी ५७ लाख ७८ हजार रुपये, विभागीय आयुक्त नागपूरसाठी ४ कोटी ९७ लाख १२ हजार रुपये असे एकूण ५६ कोटी ४ लाख ८३ हजार रुपये इतका  निधी वितरीत करण्यात  आला आहे.  हा निधी  कोविड – १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी वितरित करण्यात आला असल्याचे मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.