जालन्याचे माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांचे निधन

बस आणि रिक्षाने प्रवास करणारा खासदार म्हणून होती त्यांची ख्याती

भोकरदन ,१ नोव्हेंबर /प्रतिनिधी :-औरंगाबाद जालना लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार राहिलेले पुंडलिक हरी दानवे ( ९५ वर्षे राहणार पिंपळगाव सुतार तालुका भोकरदन जिल्हा जालना) यांचे सोमवारी सकाळी दहा वाजता औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात निधन झाले त्यांच्यावर एक महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.

दानवे यांच्यावर त्यांच्या मूळगावी पिंपळगाव सुतार तालुका भोकरदन येथे मंगळवारी(२ नोव्हेंबर ) दुपारी साडेबारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पुत्र राष्ट्रवादी काँग्रेस भोकरदन चे माजी आमदार चंद्रकांत दानवे, पिंपळगाव सुतार येथील माजी सरपंच बबनराव दानवे सुधाकर दानवे,कन्या जिजाबाई जाधव जावई सुना नातवंडे पतवंडे असा परिवार आहे.

पुंडलिक हरी दानवे सर्वत्र पीएचडी या टोपण नावाने प्रसिद्ध होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारे पुंडलिकराव दानवे यांची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाली. आपल्या राजकीय जीवनाला भारतीय जनसंघाच्या माध्यमातून सुरुवात केली 1967 झाली ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सुतार या गावचे पंधरा वर्ष सरपंचपद भूषविले त्यानंतर पंचायत समिती भोकरदन च्या निवडणुकीतही त्यांनी विजय संपादन केला जिल्हापरिषदेच्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला त्यानंतर जालना जिल्हा औरंगाबाद मध्ये असताना त्यांनी काँग्रेसचे बाबुराव काळे यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली.

पाच वेळा जालना लोकसभा मतदार संघातून त्यांनी भारतीय जनसंघ व नंतर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली त्यात त्यांना दोन वेळा यश आले १९७७ जनता लाटेमध्ये ते खासदार झाले होते. त्यानंतर १९८९ मध्ये अल्प काळ राहिलेल्या लोकसभेचे सदस्यत्व भूषविण्याचा मानही त्यांना मिळाला होता. १९८९ ची लोकसभा बरखास्त झाल्यानंतर त्यांनी खासदारांना मिळत असलेला रेल्वे सवलतीचा पास जमा करून दिल्ली ते औरंगाबाद असा सर्वसाधारण दर्जाच्या डब्यातून प्रवास केला होता. व्ही पी सिंग सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांना फोडण्याचा ही प्रयत्न झाला होता परंतु त्यांनी आपल्या निष्ठा भारतीय जनता पक्षासोबत कायम ठेवल्या होत्या. बस आणि रिक्षाने प्रवास करणारा खासदार म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. राजकारणात एवढ्या मोठ्या अत्युच्च पदावर राहूनही त्यांनी आपली साधेपणाची वर्तणूक कधीच बदलली नाही. भारतीय जनसंघाचे तत्कालीन नेते अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी नानाजी देशमुख,कुशाभाऊ ठाकरे सुंदर सिंह भंडारी दत्तोपंत ठेंगडी,कर्नाटक केसरी जगन्नाथ जोशी यादवराव जोशी आदीं समवेत जिव्हाळ्याचे संबंध तर होतेच यांच्यासमवेत पक्ष कार्य करण्याची ही संधी त्यांना मिळाली होती.

पुंडलिकराव दानवे यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्यानंतर त्यांच्या पत्नी केशरबाई दानवे वय ८६ वर्षे यांचे २८ ऑक्टोंबर रोजी निधन झाले त्यांच्यावर २९ ऑक्टोंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नीच्या निधनानंतर अख्ख्या चार दिवसातच पुंडलिकराव दानवे यांचेही निधन झाले.

मी तर जन्मजात पीएचडी आहे.. म्हणजे पुंडलिक हरी दानवे=सुरेश केसापूरकर

“मी तर जन्मजात पीएचडी आहे.. म्हणजे पुंडलिक हरी दानवे “असे अतिशय खळखळून बोलणारे दिलखुलास व्यक्तीमत्व.. क्षणोक्षणी यमक अलंकारिक भाषेत अत्यंत चपलख कोट्या करून मनमुराद हसवत परंतू तितकेच गंभीर बोलणारे पुंडलिकराव दानवे आज आपला निरोप घेऊन गेलेत.


1977 पासूनचा इतिहास डोळ्यासमोर येतोय ..”साधी राहणी अन् उच्च विचारसरणी “याचे प्रत्यक्ष जिवंत उदाहरण काका होते..
1977 आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची जाहीर झालेली उमेदवारीची बातमी त्यांना सकाळच्या सात वाजताच्या औरंगाबाद आकाशवाणीवरच्या बातमी ऐकून कळाली होती राजकारणातील अतिशय सभ्य आणि सच्चे शुध्द आणि सात्विक व्यक्तीमत्व ते होत..
डोक्यावर गांधी टोपी ,धोतर आणि पांढरा सदरा ..स्वच्छ सकारात्मक स्वभाव मुळात पुंडलिकराव हे तसे कधीच राजकीय नेते मला वाटतच नव्हते .. जमिनीवरील त्यांचे पाऊल कधीच ढळले नाही..
भोकरदन विधानसभेत त्यांचे चिरंजीव चंद्रकांत दानवे पहिल्या पोटनिवडणुकीत उभे असताना शरद पवारांची सभा भोकरदन येथे होती पवारसाहेब बोलण्याच्या आधी पुंडलिकरावांचे भाषण झाले अतिशय खळखळून हसवत प्रतिस्पर्ध्याला मार्मिक चिमटे काढून बोलण्यात ते खूपच पटाईत होते ..यासभेत पुंडलिकरावांचे जोशपूर्ण भाषण झाले आणि सभेला जमलेला जमाव उठला ..पवारसाहेबांना ऐकायची कुणालाच आवश्यकता भासली नाही ..स्वतः पुंडलिकरावांनी जनतेसमोर हात जोडून थांबण्याची विनंती केली ..इतके प्रभावी बोल त्यांना ईश्वरदत्त देणगी मिळालेली होती.
मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन समाजवादी डाव्या विचारसरणीतील राजकीय नेत्यांकडून चाललेल्या अनेक हालचालींच्या बैठकीत पुंडलिकराव जाऊन बसत तर त्या मंडळींना ते आपलेच भासत..दिल्ली ते गल्लीतील राजकारणातील अनेक प्रसंग घडलेले किस्से अतिशय मनमोकळे सांगण्याचा काकांचा स्वभाव होता .
आज आपण जे राजकीय वर्तुळातील नेते बघतोय अनुभवतोय त्या सगळ्याच बाबतीत एक अपवाद असलेले पुंडलिकराव दानवे यांच्या जाण्याने एका मोठ्या युगाचा अंत झालाय..
भावपूर्ण श्रध्दांजली.
सुरेश केसापूरकर