सरदार पटेलांना सामर्थ्यशाली, सर्वसमावेशक,संवेदनशील आणि सतर्क भारत हवा होता-पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्राला केले संबोधित

सरदार पटेल हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून प्रत्येक देशवासीयांच्या हृदयात त्यांचे स्थान अढळ

नवी दिल्ली ,३१ ऑक्टोबर /प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त केलेल्या आपल्या भाषणातून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.  ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या आदर्शासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सरदार पटेल यांना त्यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली.  ते म्हणाले की, सरदार पटेल हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून  प्रत्येक देशवासीयाने  आपल्या  हृदयात त्यांना अढळ स्थान दिले आहे, आणि जे लोक त्यांचा एकतेचा संदेश पुढे नेत आहेत, तेच अखंड एकतेच्या‌ भावनेचे खरे प्रतीक आहेत.  देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील  राष्ट्रीय एकता संचलन(कवायती)आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीवरील कार्यक्रम याच भावना प्रतिबिंबीत करत आहेत, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. 

 ते पुढे म्हणाले, की भारत म्हणजे  केवळ भौगोलिक एकसंध प्रदेश  नाही तर आदर्श, संकल्पना, सभ्यता आणि संस्कृतीच्या उदार मानकांनी परिपूर्ण असे राष्ट्र आहे.  ते म्हणाले, 130 कोटी भारतीय जिथे राहतात तो हा भूभाग हा आपल्या अंतरात्म्याचा, स्वप्नांचा आणि आकांक्षांचा अविभाज्य घटक आहे

एक भारताच्या भावनेने भारताची  लोकशाही परंपरा समर्थ करण्याचा संदर्भ देत, देशाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने, प्रत्येक नागरिकाने सामूहिक प्रयत्न करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.  सरदार पटेल यांना एक बलशाली, सर्वसमावेशक, संवेदनशील आणि सतर्क भारत हवा होता, यावर पंतप्रधानांनी भर दिला.  असा भारत जो  नम्र तसेच विकासगामी  आहे.  “सरदार पटेल यांच्या प्रेरणेने भारत बाह्य आणि अंतर्गत आव्हानांना तोंड देण्यास पूर्णपणे सक्षम आहे,”असेही  त्यांनी पुढे सांगितले.

 गेल्या 7 वर्षात देशाला सामर्थ्यशाली करण्यासाठी उचललेल्या उद्दिष्टांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सांगितले की, देशातून जुन्या अनावश्यक कायद्यांचे उच्चाटन केले गेले,एकात्मतेचे आदर्श मजबूत झाले आणि दळणवळणाची संसाधने आणि पायाभूत सुविधांवर भर दिल्याने भौगोलिक आणि सांस्कृतिक अंतर कमी झाले.

“आज, ‘एक भारत- श्रेष्ठ भारत’ या भावनेला अधिक बळकट करत, सामाजिक, आर्थिक आणि घटनात्मक एकात्मतेचा ‘महायज्ञ’ चालू आहे आणि जल, आकाश, जमीन आणि अंतरिक्ष यांच्या संदर्भातील देशाच्या क्षमता तसेच संकल्प अभूतपूर्व आहेत  आणि राष्ट्र  आत्मनिर्भरतेच्या नवीन मोहिमेच्या दिशेने वाटचाल करत आहे. ‌ स्वातंत्र्याच्या या  अमृत कालखंडाच्या वाटचालीतील ‘सबका प्रयास’ ही संकल्पना अधिक समर्पक आहे यावर त्यांनी जोर दिला.  “हा ‘स्वातंत्र्याचा अमृतकाळ’ अभूतपूर्व विकासाचा, कठीण उद्दिष्टे साध्य करणारा आणि सरदार साहेबांच्या स्वप्नांतील भारताची निर्मिती करणारा कालावधी  आहे,” असे विचार पंतप्रधानांनी व्यक्त केले.  सरदार पटेल यांच्यासाठी ‘एक भारत’ म्हणजे सर्वांसाठी समान संधी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.ही संकल्पना अधिक विशद करताना पंतप्रधानांनी     सांगितले की, ‘एक भारत’ हा महिला, पददलित, वंचित, आदिवासी आणि वनवासी यांना समान संधी देणारा देश आहे. इथे घर, वीज आणि पाणी यांच्यासाठी कोणताही   भेदभाव न करता ते सर्वांच्या आवाक्यात येईल,अशी सुविधा आहे.  ‘सबका प्रयास’ यातूनही देश हेच साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.

प्रत्येक नागरिकाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे नवीन कोविड रुग्णालये, अत्यावश्यक औषधे, लसींच्या 100 कोटी मात्रा देणे हे सर्व  शक्य झाले आणि  कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘सबका प्रयत्न’ या शक्तीचा प्रत्यय आला,याचा  पंतप्रधानांनी यावेळी पुनरुच्चार केला.

 सरकारी विभागांच्या सामूहिक शक्तीचे संवर्धन ‌करण्यासाठी अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, सरकारसोबतच लोकांच्या ‘गतीशक्ती’चाही उपयोग झाला तर काहीही अशक्य नाही.  म्हणून, ते म्हणाले की, आपली  प्रत्येक कृती व्यापक राष्ट्रीय उद्दिष्टांचा विचार करून अधोरेखित केली पाहिजे.यासाठी विद्यार्थ्यांचे  उदाहरण देत ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी त्या  क्षेत्रातील नवनिर्मितीच्या  प्रवाहाचा विचार विद्याक्षेत्र  निवडताना करावा किंवा खरेदी करताना, लोकांनी त्यांच्या वैयक्तिक आवडी-निवडीसह आत्मनिर्भरतेचे ध्येय ठेवावे तेव्हाच त्या क्षेत्रातील विशिष्ट नवसंकल्पनांचा विकास होऊ  शकतो, अशी उदाहरणे त्यांनी आपल्या भाषणातून दिली.  तसेच उद्योग आणि शेतकरी, सहकारी संस्था आपल्यासाठी ध्येयाची निवड करताना देशाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवू शकतात.

पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाचे उदाहरण देत सरकारने लोकसहभागाला देशाची ताकद बनवले आहे, असे सांगितले.  “जेव्हा ‘एक भारत’या भावनेतून आपण कार्य करतो, तेव्हा आपल्याला यश मिळते आणि ‘श्रेष्ठ भारत’साठी त्यात योगदानही मिळते”, असे ते म्हणाले.