देवळाना खुर्द येथे ड्रोनद्वारे गावठाण जमीन मोजणी

खुलताबाद,३१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- देवळाना खुर्द येथे गावठाण मोजणी  व शेत जमीन मोजणी पथदर्शी प्रकल्प  ड्रोनद्वारे सुरुवात झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अभय जोशी, उप अधीक्षक भूमि अभिलेख दिलीप  बागुले,  अविनाश शिंगणे,  फयाज,  आर डी बनसोडे,  वाघ,  मोरे,   ग्रामसेवक,  सरपंच,  पोलीस पाटील व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत  ड्रोन फ्लाय करण्यात आले.

जमिन मोजणीची प्रक्रिया किचकट असते. वेळ व मणुष्यबळ देखील मोठय़ा प्रमाणावर लागते. त्यावर उपाय म्हणून आता शासनाने गावांचे सिमांकन आणि गावठाण मोजणीसाठी थेट ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. या पद्धतीद्वारे एका गावाचे गावठाण अवघ्या एका दिवसात मोजले जाणार आहे. खुलताबाद तालुक्यात हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत  आहे. जमिन मोजणीसाठी पारंपारिक पद्धत ही अत्यंत किचकट प्रक्रिया असते. खाजगी जमीन, गावठाण किंवा गावांचे सिमांकन करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यासाठी वेळ व श्रमही मोठय़ा प्रमाणावर लागतात. ही बाब लक्षात घेता भूमी अभिलेख विभागातर्फे त्यात विविध प्रकारचे बदल आतार्पयत करण्यात आले आहेत. या बदलांमध्येही अपेक्षीत वेग आलेला नाही. त्यामुळे आता ड्रोनद्वारे जमीन मोजणी केली जाणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे. पुणे, नगर जिल्ह्यात या पद्धतीने जमीन मोजणी केली जात आहे. लवकरच  खुलताबाद तालुक्यात देखील हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. ईटीएस पद्धतीचा वापरपूर्वी पारंपारिक पद्धतीत अर्थात सिमांकन करून जमीन मोजणी केली जात होती. त्याला मोठा कालावधी लागत होता. त्यानंतर इटीएस यंत्राच्या सहाय्याने जमीन मोजणी केली जावू लागली. यामुळे वेळ वाचला परंतु किचकट प्रक्रिया कायम राहिली. त्यापुढे जावून आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी भुमिअभिलेख विभाग सरसावला  आहे. त्याकरीता विविध आधुनिक पद्धतीचा वापर केला जात आहे. त्यातीलच ड्रोनद्वारे हवाई मोजणी करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. भुमी अभिलेखचे अभियान जमीन मोजण्यासाठी भुमी अभिलेख विभागाने विशेष अभियान राबविण्या सुरुवात केली आहे. यासाठी त्यांना केंद्राच्या सर्व्हे ऑफ इंडिया विभागाचेही सहकार्य लाभत आहे. राज्य शासन आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो. जमीन मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मोजणी फी भरुन त्याची नोंद मोजणी नोंदवहीत घेतली जाते. संबंधितधारकांना आगावू नोटीसद्वारे कळवून मोजणीची तारीख निश्चित केली जाते. ठरलेल्या दिवशी भूमापक जागेवर येऊन प्रत्यक्ष कब्जेदाराच्या मोजणी अर्जदार, लगत कब्जेदार व पंचमंडळी यांच्या समक्ष मोजणी कामास सुरुवात केली जाते. वहिवाटीच्या खुणांवर निशाण लावून त्याआधारे प्लेन टेबलवर ठेवलेल्या नकाशा शीटवर वहिवाटीची आकृती नगरभूमापन मोजणीत १.५०० या परिमाणात तर शेतजमिनीची मोजणी १.१००० या परिमाणात तयार होते. त्यानंतर मूळ अभिलेखाच्या आधारे वहिवाटीच्या नकाशावर सुपर इंपोज करुन नकाशावर हद्दीच्या खुणा निश्चित केल्या जातात आणि त्या नकाशाच्या आधारावर मूळ अभिलेखाप्रमाणे अर्जदारास हद्दीच्या खुणा कायम करुन प्रत्यक्ष जागेवर नव्याने दाखवल्या जातात. अशा प्रकारे जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण होते. जमिन मोजण्याची प्रक्रिया सुरळीत व वेगाने व्हावी यासाठी ड्रोनद्वारे जमिन मोजणीचा पथदर्शी प्रकल्प खुलताबाद तालुक्यातील देवळाना खुर्द  सुरू करण्यात आला आहे.