पंतप्रधानांची व्हॅटिकन शहराला भेट

व्हॅटिकन,३० ऑक्टोबर:-परमपूज्य पोप फ्रान्सिस यांनी 30 ऑक्टोबर 2021 ला व्हॅटिकन शहरातील अपोस्टोलिक राजवाड्यात झालेल्या एका खासगी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

Banner

सुमारे दोन दशकांहून अधिक कालावधीनंतर होत असलेली भारतीय पंतप्रधान आणि धर्मगुरू पोप यांची ही पहिलीच भेट आहे. जून 2000 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी व्हॅटिकनला भेट देऊन तत्कालीन पोप परमपूज्य जॉन पॉल दुसरे यांची भेट घेतली होती. भारत आणि व्हॅटिकन यांच्यातील मैत्रीची परंपरा जुनी असून या दोन देशांमध्ये 1948 सालापासून राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले आहेत. भारतात राहणाऱ्या कॅथोलिक लोकांची संख्या आशियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त कॅथोलिक लोकसंख्या आहे.

आजच्या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यामुळे जगभरातील लोकांना सोसाव्या लागणाऱ्या परिणामांबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी हवामान बदलामुळे समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांबद्दल देखील चर्चा केली. हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांबद्दल तसेच कोविड -19 प्रतिबंधक लसीच्या 1 अब्ज मात्रा देण्यात भारताने मिळविलेल्या सफलतेबाबत पंतप्रधानांनी पोप यांना थोडक्यात माहिती दिली. महामारीच्या काळात गरजू देशांना अनेक प्रकारे मदत केल्याबद्दल पोप यांनी भारताचे कौतुक केले.

पंतप्रधानांनी परमपूज्य पोप फ्रान्सिस यांना नजीकच्या काळात भारत भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले आणि पोप यांनी ते सहर्ष स्वीकारले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीदरम्यान कार्डीनल पिएत्रो पारोलिन यांची देखील भेट घेतली.