कोरोनामुक्तीसाठी पंढरीच्या पांडुरंगाला साकडं

गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची पंढरपूरला भेट

मुंबई/पंढरपूर, दि. २८- आषाढी एकादशीची वारी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व आरोग्य व्यवस्था पाहणी करता गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूरला काल भेट दिली. 

महाव्दार चौकातून  दर्शन घेताना गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाला साकडं घातलं “विठू माऊली तू माऊली जगाची आर्त साद तुज ही कोरोना मुक्तीची संपूर्ण जग भारत व महाराष्ट्रातून या कोरोनाला घालव व शतकांपासून चालत आलेली वारीची परंपरा पूर्ववत लवकरच चालू होण्यासाठी आशिर्वाद असू द्या. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे,आ.भारत भालके उपस्थित होते.

पांडुरंगाच्या दर्शनानंतर गृहमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले की, पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. त्या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करावे.

भाविकांनी घरातूनच नामस्मरण व पूजा करावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. गृहमंत्र्यांना यावेळी वीणा, वारकरी पारंपरिक पोशाख, तुळशी हार देण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गृहमंत्र्यांना दिली.

या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर,अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.