वैजापूर तालुक्याला नुकसानीपोटी 80 कोटी 4 लाख रुपये ; मात्र, 70 टक्केच रक्कम शेतकऱ्यांना मिळणार

जफर ए.खान 

वैजापूर,३० ऑक्टोबर /प्रतिनिधी:- वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीसाठी राज्य सरकारने 80 कोटी 4 लाख 86 हजार 250 रुपये निधी मंजूर केला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्याच्या सूचना प्रशासन स्तरावरून देण्यात आल्या असून मंडळनिहाय बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून सोमवारपासून निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.मात्र 30 टक्के रक्कम कपात करून 70 टक्केच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे समजते.

यावर्षी सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात पावसाने चांगलाच कहर केला.जवळपास 1 लाख 4 हजार 816 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. राज्य शासनाने 2 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयानुसार वैजापूर तालुक्यातील 1 लाख 30 हजार 187 शेतकऱ्यांना 106 कोटी 24 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, 80 कोटी 4 लाख 86 हजार रुपये एवढाच निधी वितरणासाठी प्राप्त झाला असंल्याने 70 टक्केच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे समजते.

जिरायतीसाठी 10 हजार रुपये,बागायतीसाठी 15 हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टरी मदत मिळणार आहे.आधी जुलै महिन्यातील नुकसानीपोटी मदत देण्यात आल्यानंतर आता ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी शासनाने मदत निधी वितरणाचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. या टप्प्यात वैजापूर तालुक्याच्या वाट्यावर 80 कोटी 4 लाख 86 हजार रुपये निधी आला असून, हा निधी वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सध्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या करण्याचे काम महसूल विभागातर्फे सुरू असून उद्यापर्यंत याद्या तयार होऊन सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.