कोरोना रोखण्यासाठी सेल्फ असेसमेंट टूल, टेलिमेडिसीन आणि महाकवच ॲप

आतापर्यंत लाखो लोकांनी केला ऑनलाईन सुविधांचा वापर – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई, दि. 28 – कोरोना संकटकाळात कौशल्य विकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत विविध डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सोसायटीच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेले महाकवच ॲप, सेल्फ असेसमेंट टूल, टेलिमेडिसीन हेल्पलाईन यांचा राज्यातील लाखो लोकांनी लाभ घेतला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या सर्व सुविधा अजुनही ऑनलाईन उपलब्ध असून कोरोनाचा प्रसार पाहता आवश्यकतेनुसार नागरिकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोरोनाच्या लक्षणांची स्व-चाचणी (सेल्फ असेसमेंट)

https://covid-19.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर नागरिकांसाठी स्वचाचणी (सेल्फ असेसमेंट टूल) साधन तयार केले आहे. कोरोनाची शक्यता वाटत असल्यास या टूलच्या आधारे नागरिक स्वत: प्राथमिक स्वरुपाची स्वचाचणी करु शकतात. कोरोनाबाधित असण्याची शक्यता घरबसल्या समजून घेऊ शकतात. त्वरित वैद्यकीय सल्ला आणि इतर संबंधित संपर्कांचा तपशील देखील या लिंकवर उपलब्ध आहे. तीव्र लक्षणे दर्शविणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रशासनालाही याचा उपयोग होतो. आतापर्यंत लाखो जणांनी याचा लाभ घेतला आहे. अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या सहकार्याने हे टूल तयार केले आहे.  

टेलिमेडिसिन हेल्पलाईन

कोविडविषयक माहिती आणि मदतीसाठी ९५१३६१५५५० ही टेलिमेडिसिन हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर फोन करुन नागरिक कोरोना संबंधित लक्षणांचे स्वत:चे स्क्रिनींग करु शकतात. आयव्हीआर तंत्रज्ञानावर त्यांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे आवश्यकतेनुसार डॉक्टर त्यांना काही वेळात परत कॉल करू शकतात. ते कोरोनाबाधित व्यक्ती आहेत की इतर आजार आहेत याबाबत सल्ला देऊ शकतात. पुढील कार्यवाहीसाठी उच्च धोक्याच्या व्यक्तींची यादी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे देण्यात येते. ही हेल्पलाईन पीपीसीआर, व्यवसाय स्वयंसेवक गट, उद्योग आणि स्टार्टअपचे स्वयंसेवक आणि स्टेपवन यांच्या सहकार्याने कार्यान्वित करण्यात आली.

रुग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी महाकवच ॲप

रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणारे आणि त्यांचे क्वारंटाइन व्यवस्थापन करणारे महाकवच हे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहे. या ॲपमुळे कोरोनाबाधित व्यक्तीचा मागील 21 दिवसांचा मागोवा (Location History), कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले हाय रिस्क व लो रिस्क कॉन्टॅक्ट्सचे संपर्क क्रमांक, कोरोनाबाधित व्यक्तीने भेट दिलेली सार्वजनिक ठिकाणे म्हणजेच हॉटस्पॉट्सची माहिती कळते. तसेच प्रशासनाला ही सर्व माहिती एकाच ठिकाणी रिअल-टाइम डॅशबोर्डवर दिसते. याबरोबरच क्वारंटाइन (मॅनेजमेंट) व्यवस्थापनाकरता महाकवच ॲप डाऊनलोड केल्यानंतर जीओ पेन्सिंगमुळे नागरिकांना एका मर्यादित त्रिज्येतच वावरण्याची मुभा असते. जेव्हा ही त्रिज्या नागरिक ओलांडतात तेव्हा ॲपद्वारे ही माहिती लगेच प्रशासनाला समजते. तसेच सेल्फी अटेंडन्स या वैशिष्ट्याद्वारे जेव्हा जेव्हा विचारणा होईल तेव्हा अशा व्यक्तीला सेल्फी काढून तो ॲपद्वारे प्रशासनाकडे पाठवावा लागतो, यामुळे नागरिक फोन घरी ठेवून बाहेर गेल्यास लगेच प्रशासनाला समजते. या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीमध्ये आणि अंमलबजावणीमध्ये नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल, नाशिक महापालिका, डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर (टीसीएस फाऊंडेशन), कुंभेथॉन  इनोवेशन फाऊंडेशन, टेक एक्स्पर्ट यांचा महत्त्वाचा सहभाग राहीला. राज्यात या ॲपचा प्रभावीपणे वापर करण्यात आला आहे.

या पुढाकारांव्यतिरिक्त सोसायटीने स्टार्टअप नेटवर्क विकासाचे काम सुरूच ठेवले आहे. वापरलेल्या पीपीई किट्ससाठी यूव्ही-आधारित जंतुनाशक, दाट लोकसंख्या असलेल्या भागात संदेश पाठवण्यासाठी ड्रोन सुसज्ज करणे यांसारख्या कोरोनाशी संबंधित विविध उपायांवर कार्य करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *