मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त

मुंबई ,२९ ऑक्टोबर /प्रतिनिधी:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त झाले आहेत. राज ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. राज ठाकरे यांची बहीण आणि आई या देखील कोरोनामुक्त झाल्या आहेत.त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. जलील परकार यांनी ही माहिती दिलीय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे 23 ऑक्टोबर रोजी समोर आले होते. त्यानंतर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले होते. आज दुपारी त्यांची पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधक चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आज संध्याकाळी आला. यामध्ये राज ठाकरे कोरोनामुक्त झाल्याचे समजले. गेल्या शुक्रवारी कुंदाताई ठाकरे यांना तरे गेल्या शनिवारी राज ठाकरे आणि जयजयवंती देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी यापूर्वीच कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

सध्या सर्वच पक्ष महापालिका निवडणुकीची तयारी करत आहेत. पक्षबांधणी तसेच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याकडे भर दिला जात आहे. मनसेनेदेखील मेळावे, बैठका सुरु केल्या आहेत. 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे मुंबई आणि पुण्यात कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आले होते. मात्र राज यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर हे मेळावे पुढे ढकलण्यात आले होते.