कमी उत्पादन ; शासकीय खरेदी केंद्रे सुरू नाही कापसाने खाल्ला भाव, खुल्या बाजारात कापसाला 7000 ते 7500 प्रति क्विंटल भाव

जफर ए.खान

वैजापूर,२६ ऑक्टोबर:-

वैजापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांना फटका बसला असून, कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.कापसाचे उत्पादन कमी झाले, त्यात शासकीय कापूस खरेदी केंद्रे ही सुरू न झाल्याने कापसाने “भाव” खाल्ला आहे. सद्या खुल्या बाजारपेठेत कापसाला प्रति क्विंटल 7 हजार ते 7 हजार 500  रुपये भाव मिळत आहे.कापसाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असून,10 ते 12 हजारापर्यंत भाव जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी दिसत आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर वैजापूर शहर व ग्रामीण भागात खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केली असून,शासनाने जाहीर केलेल्या सहा हजार पंचवीस रुपये या खरेदी भावापेक्षा जास्त म्हणजे 7 हजार ते 7 हजार 500 रुपये भावाने खासगी व्यापारी कापसाची खरेदी करीत आहेत.यंदा अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कपाशी पिकालाही फटका बसला असून, सध्या अत्यंत कमी कापूस बाजारात विक्रीसाठी येत आहे.

शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून शेतीमाल खरेदीत अडवणूक होऊ नये,यासाठी शासनामार्फत हमी भावाने खरेदी केली जाते. कापूस खरेदीसाठी शासनाने एकाधिकार योजना बंद करून’सीसीआय’ चा सब एजंट म्हणून पणन महासंघाची राज्यात नियुक्ती केली. दरवर्षी खरीप हंगामातील कापसाची खरेदी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तालुकास्तरावर केंद्र उघडले जाते.मात्र,गेल्या काही वर्षांपासून कापूस खरेदीचे नियोजन कोलमडल्याचे दिसून येते.त्यामुळे खासगी व्यापार ‘गरम’ होऊन व्यापाऱ्यांची दिवाळी होत आहे.

पणन महासंघ आणि ‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र वेळेत सुरू होत नसून,शेतकऱ्यांचा कापूस संपण्यापूर्वीच बंदही होतात.त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना खासगी बाजाराचा रस्ता धरावा लागतो यातूनच व्यापारी ‘भाव’ खातात. मात्र, या कारभारात सुधारणा होण्याऐवजी अधिकच ढेपाळत असल्याचे चित्र समोर येत आहे. “ओपन मार्केट” ही संकल्पना रुजविण्यात आली असून,त्याची अंमलबजावणीही केली जात आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना कापूस वेचणी होऊन घरी येत असतांना अद्यापपर्यंत पणन महासंघातर्फे कापूस खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. खुल्या बाजारपेठेस परवानगी देण्यात आल्याने ‘सीसीआय’ चा सब एजंट म्हणून राज्यात कापूस खरेदी करणारा पणन महासंघ अडचणीत आला आहे. त्यामुळे पणन महासंघाची कापूस खरेदी यंदा सुरू होते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.