चित्रपटांमधून हिंसाचार आणि अश्लीलतेला थारा देऊ नये, उपराष्ट्रपतींचे चित्रपट निर्मात्यांना आवाहन

आपली संस्कृती आणि परंपरा यांना धक्का लागेल अशी कोणतीही गोष्ट सिनेक्षेत्राने करू नये –उपराष्ट्रपती

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते रजनीकांत आणि इतर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचे केले अभिनंदन

नवी दिल्ली, २५ऑक्टोबर /प्रतिनिधी :-चित्रपटांमधून हिंसाचार, अश्लीलता आणि  असभ्यतेला थारा न देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम वेकैंय्या नायडू यांनी चित्रपट निर्मात्यांना केले आहे. सिनेजगतातील प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना प्रदान केल्यानंतर आणि विविध भाषांमधल्या चित्रपट अभिनेत्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते आज बोलत होते. चित्रपट म्हणजे उच्च उद्देश, सामाजिक आणि नैतिक संदेश देण्यासाठीचे साधन असावे असे त्यांनी सांगितले. चित्रपटातून हिंसाचाराचे ठळक दर्शन न घडवता सामाजिक अनिष्ट बाबीं विरोधात समाजाच्या नापसंतीचा आवाज उठवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Image

आपली महान संस्कृती, परंपरा, मुल्ये यांना धक्का लागेल अशी कोणतीही बाब करू नये असे आवाहन त्यांनी सिने जगताला केले. 

जगातला सर्वात मोठा चित्रपट निर्माता ही भारताची सॉफ्ट पॉवर असल्याचा उल्लेख करत आपले चित्रपट जपान, इजिप्त, चीन, अमेरिका, रशिया, मध्य पूर्व आणि ऑस्ट्रेलियासह संपूर्ण जगभरात पाहिले आणि नावाजले जातात असे ते म्हणाले. चित्रपटांना भौगोलिक आणि धार्मिक सीमा नसून चित्रपट सार्वत्रिक भाषा व्यक्त करतात. राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे भारतीय चित्रपट उद्योगातल्या प्रतिभेचे, समृद्धतेचे आणि वैविध्याचेही दर्शन घडवतात. हवामान बदलाच्या वास्तवाचा उल्लेख करत, सिने जगताने, निसर्गाच्या जोपासनेचे महत्व अधोरेखित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. कोविड-19 महामारीनेही आपल्याला निसर्गाचे महत्व जाणवून दिल्याचे ते म्हणाले.

या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल रजनीकांत यांचे त्यांनी अभिनंदन केले.  रजनीकांत यांची आगळी  शैली आणि अभिनय कौशल्याने भारतीय चित्रपट उद्योगाला नवा आयाम दिल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. मुन्द्रू मुदिचू, शिवाजी: द बॉस, वायथीनिले, बैरवी या चित्रपटातील त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांचा उल्लेख करत थलैवा यांनी कलात्मक अभिव्यक्ती आणि सर्वसामान्यांना भावेल असा अभिनय असा उत्तम समतोलाचा आविष्कार घडवला असे ते म्हणाले.

सर्वोच्च चित्रपट स्नेही राज्याचा पुरस्कार सिक्कीम या राज्याने पटकावला.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एस मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा, फीचर्स फिल्म्स ज्युरीचे अध्यक्ष एन. चंद्रा, कथाबाह्य चित्रपट ज्युरी अध्यक्ष अरुण चढ्ढा इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.