विराट सेनेला मोठा धक्का, पाकिस्तानकडून भारताचा 10 विकेट्सने पराभव

दुबई: टी20 विश्वचषकातील सर्वात बहुप्रतिक्षित सामना असणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांची अखेर सांगता झाली आहे. उत्कृष्ट खेळाचं दर्शन घडवत पाकिस्तान संघाने 10 विकेट्सनी दमदार विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघाची विश्वचषकातील सुरुवातच अतिशय खराब झाली आहे.

अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीलाच खराब सुरुवात आणि सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघ पराभूत झाला. आधी खराब फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्या. ज्यानंतर पाकिस्तान संघाने अप्रतिम अशी फलंदाजी करत सामना 10 विकेट्सने खिशात घातला. विशेष म्हणजे पाकच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकं ठोकली.

भारताची अत्यंत सुमार फलंदाजी

सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.

पाकिस्तानचा दमदार विजय

152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.