आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले हात – जय बाबाजी भक्तांचा अनोखा उपक्रम

Displaying IMG20211022164704.jpg

खुलताबाद ,२४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना मदत करण्यासाठी जय बाबाजी मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य सुरु केले आहे. दिवाळी निमित्त जय बाबाजी भक्त परिवाराकडून अन्नधान्य व किराणा सामान, गरजूंना कपडे, साड्यांचे वाटप केले जात आहे.
 सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने पिके उध्वस्त झाली. सखल भागातील घरांमध्ये मुसळधार पावसाचे पाणी शिरले. नदीकाठची अनेक घरे जमीनदाेस्त झाली. काही क्षणात हाेत्याचे नव्हते झाले. घरातील अन्नधान्य, कपडे, गाद्या, चादरी यांसह सर्व काही पाण्यात भिजले. अनेकांनी घर साेडून धार्मिक स्थळांचा आधार घेतला. यावेळी मदतीसाठी जय बाबाजी भक्त धावून आले.  जय बाबाजी भक्त परिवाराचे राजेंद्र पवार यांच्या पुढाकारातूनजमेल त्या परीने मदत करण्यात येत असून मदत केंद्राच्या माध्यमातून मदत केली जात असल्याचे चित्र आहे.

राज्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मदतीची घोषणा केली असली तरीही प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत आर्थिक मदत पोहचलेली नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वात मोठा दिवाळी सण साजरा करण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी शेतमजूर सेवा केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती जय बाबाजी भक्त परिवाराचे राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
जिल्ह्यातील पहिले मदत केंद्र काटशिवरी फाटा गदाना येथे सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन अतिवृष्टीमुळे गदाना येथील बाधित शेतकरी सुभद्राबाई कचरू कुकलारे, उत्तम जाधव, सिताराम वाकळे यांच्या हस्ते करण्यात आले. 
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यांना देऊ केलेली आर्थिक मदत अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नसली तरीही विश्व शांती धाम निर्माण संस्थेच्या माध्यमातून जय बाबाजी भक्त परिवाराने गरजवंत बाधित शेतमजूर, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी सप्ताह उपक्रमाद्वारे मदतीचा हात पुढे केला आहे. या केंद्रात बाधित शेतकऱ्यांनी नाव नोंदवून त्यांना घरपोच साहित्य वाटप करण्यात येत आहे.
वेरुळ येथील जनार्दन स्वामींनी कृषिप्रधान देशातील कष्टकरी शेतकऱ्यांसाठी कृषि सेवा, गोसेवा, देश सेवा, मानव सेवा आणि व्यसनमुक्ती हे समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. त्यांचाच वारसा शांतिगिरी महाराज यांनी पुढे चालविला आहे. 
औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्य किट, साडी, पातळ, वस्त्र, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मुलींचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी नोंदणी, शेतात जाण्यासाठी पावसामुळे खराब झालेले दळणवळणासाठी बाधित क्षेत्रातील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी जेसीबी व ट्रॅक्टर याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर स्टेशन ( गंगापूर ), महालगाव ( वैजापूर ), पिशोर, चापानेर (कन्नड ), तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड, पैठण या तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत केंद्रावरून साहित्य वाटप केले जाणार आहे. यावेळी पंचायत समितीचे सभापती गणेश अधाने, प्रगतिशील शेतकरी दिपक चव्हाण, नागेश्वरानंदजी, राजू चव्हाण, प्रकाश चव्हाण, गणपत म्हस्के, मनोहर गावडे, भिकन आल्हाड ,भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल श्रीखंडे उपस्थित होते.