शहाजीराजे भोसले स्मारकाचे रूप पालटणार सीएसआर निधीतून गढीचे संवर्धन – जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

खुलताबाद ,२२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वेरूळ येथील शहाजीराजे भोसले यांच्या स्मारकाच्या नशिबी कायमच सापत्न वागणूक आली आहे. शहाजीराजे भोसले यांच्या पुतळ्याचे अनावरण करून १४ वर्ष पूर्ण झाले तरीही स्मारकाचा वनवास संपायला तयार नाही. मात्र, औरंगाबादचे जिल्हाधिकारी  सुनील चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शहाजीराजे भोसले स्मारकाचे रूप पालटणार असून भोसल्यांच्या गढीच्या संवर्धनाचे काम सीएसआर निधीतून हाती घेतले जाणार आहे.

Displaying IMG-20211021-WA0061.jpg

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वेरूळ येथील शहाजीराजे भोसले स्मारकाला भेट देऊन पाहणी केली. शहाजीराजे भोसले यांच्या पुतळ्याची व  छत्रीची झालेली दुरावस्था पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सीएसआर निधीतून स्मारकाच्या विकासासाठी तसेच  गढीचे संवर्धन करण्यासाठी काय काय कामे करता येतील याचा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आढावा घेतला. शहाजीराजे भोसले यांच्या पुतळ्याची देखभाल दुरुस्ती व छत्री बसविणे,  रॅम दुरुस्ती करण्यासाठी  नवीन मुख्य प्रवेशद्वार उभारण्याची सूचना केल्या. दर्शनी भागात मुख्य प्रवेशद्वार उभारून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जावे अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या.
यावेळी  उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कल्याण भोसले, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता दिलीप कोलते, माजी सरपंच प्रकाश मिसाळ, कनिष्ठ अभियंता सागर सावजी,  कनिष्ठ अभियंता नरेंद्र देशमुख,  ग्रामसेवक स्वप्नील घरमोडे उपस्थित होते.

शहाजीराजे भोसले यांच्या स्मारकाचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करून लोकार्पण सोहळा आयोजित  करून स्मारक पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी शहाजीराजे भोसले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, वेरूळच्या सरपंच कुसुम मिसाळ , उपसरपंच ऍड विजय राठोड यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून केली आहे.अलीकडेच राज्याचे 
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी  वेरूळ येथील मालोजीराजे भोसले यांच्या गढीला भेट देऊन गढीच्या संरक्षण आणि संवर्धन करण्याची योजना आखली असल्याचे जाहीर केलेले आहे.