अँपच्या माध्यमातून वृक्षगणना करून घ्यावी,26 जानेवारी पर्यंत वृक्षगणना अंतिम करण्याचे प्रशासकांचे निर्देश

औरंगाबाद, २१ऑक्टोबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील वृक्षगणने साठी विशेष मोबाईल एप्लिकेशन विकसित करून लोकसहभागातून वृक्षगणना करण्याचे निर्देश आज औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले.
शहरातील वृक्षगणना बाबत औरंगाबाद महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि औरंगाबाद फर्स्ट यांची संयुक्त बैठक प्रशासक दालनात आयोजित करण्यात आली होती.


या बैठकीत मार्गदर्शन करताना प्रशासक म्हणाले की जलशिवार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन इत्यादी प्रकल्पात लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने विशेष मोबाईल एप्लिकेशन्स विकसित करण्यात आले होते, या एप्लिकेशन्सचा जिओ टेगिंग डाटा अजूनही उपलब्ध आहे. याच धर्तीवर वृक्षगणना करण्यासाठी एक मोबाईल एप्लिकेशन विकसित करून या माध्यमाने लोकसहभागातून वृक्षगणना करून घ्यावी, ते म्हणाले. सदरील अँप चे नाव औरंगाबाद ट्री सेन्सस एप (ए टी सी अँप) ठेवण्याचे त्यांनी यावेळेस सुचविले. या एप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिक आपले परिसर, कार्यालय इत्यादीतील वृक्षांचे फोटो काढून एपवर अपलोड करतील. या कामासाठी कृषी महाविद्द्यालयांचे विद्यार्थी, शाळांचे विद्यार्थी, सामाजिक कार्य संस्था यांच्या सहभाग करून घ्यावे, असे ते म्हणाले.सदरील एप 15 नोव्हेंबर पर्यंत विकसित करून 26 जानेवारी पर्यंत वृक्षगणना चे काम पूर्ण करण्याबाबत त्यांनी सूचना केली.
या बैठकीत शहर अभियंता एस डी पानझडे, कार्यकारी अभियंता सुनील काकडे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी,औरंगाबाद फर्स्टचे हेमंत लांडगे व इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.