भारतातील एकूण लसीकरणाने ओलांडला 99 कोटी मात्रांचा महत्त्वाचा टप्पा

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती-277 वा दिवस

नवी दिल्ली, १९ऑक्टोबर /प्रतिनिधी :-

भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज 99 कोटी मात्रांचा महत्त्वपूर्ण  (99,08,97,514) टप्पा ओलांडला. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत देशभरात लसीच्या 37 लाखांपेक्षा अधिक (37,92,737) मात्रा देण्यात आल्या. लसीकरणाच्या अंतिम अहवालाचे काम रात्री उशिरा पूर्ण झाल्यानंतर आज दिवसभरात देण्यात आलेल्या मात्रांच्या एकूण संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

कोविड-19संसर्गापासून सर्वाधिक असुरक्षित असलेल्या वयोगटातील लोकांच्या संरक्षणासाठी लसीकरण मोहीम हे महत्त्वाचे  साधन असल्याने या मोहिमेचा नियमित आढावा घेणे आणि सर्वोच्च पातळीवरून परीक्षण करणे सुरु आहे.

गेल्या 24 तासांत 19,470 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,34,58,801 झाली आहे.परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.14% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 114 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.गेल्या 24 तासात 13,058 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या 231 दिवसातली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा कमी झाली असून सध्या ती 1,83,118 आहे, जी मार्च 2020 पासून सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.54 % आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 11,81,314 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 59.31 (59,31,06,188) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.36% असून गेल्या 116 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.11% असून गेले सलग 50 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 133 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.