नेहरू युवा केंद्र संघटनेतर्फे मुंबईत वांद्रे परिसरात स्वच्छ भारत अभियानाचे आयोजन; 250 स्वयंसेवकांचा अभियानात सहभाग

कोणत्याही अभियानाने लोकचळवळीचे रूप घेतल्यानंतरच ते अभियान यशस्वी होते आणि ते मुंबईत घडताना मला दिसत आहे: केंद्रीय युवक व्यवहार सचिव

मुंबई,१९ऑक्टोबर /प्रतिनिधी :-केंद्रिय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसेच नेहरू युवा केंद्र संघटनेतर्फे देशव्यापी स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून आज मुंबईत वांद्रे परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बगीचा परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

आज सकाळी 9 वाजता सुरु झालेल्या या स्वच्छता अभियानात केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उषा शर्मा आणि केंद्रीय राखीव पोलीस दल व राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक तसेच मुंबईतील 15 महाविद्यालयांतील विद्यार्थी स्वयंसेवक सहभागी झाले होते.

केंद्रीय राखीव पोलीस दल, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्र संघटना, सरकारी प्रतिनिधी यांतील एकूण 250 स्वयंसेवकानी आजच्या अभियानात भाग घेतला.

Image

केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उषा शर्मा यांनी उपस्थितांना स्वच्छता शपथ देऊन आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली.

Image

“या अभियानाद्वारे 75 लाख किलो कचरा, विशेषतः प्लॅस्टिक कचरा संकलित करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आम्ही निश्चित केले आहे. आणि कालपर्यंत (18 ऑक्टोबर) 60 लाख किलो प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला असून त्याचे निर्मूलन देखील करण्यात आले आहे हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे,” अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली“. या कार्यक्रमाला जनसहभागातून लोक चळवळीचे रूप देणे हा आमचा मुख्य हेतू आहे,” असे त्यांनी पुढे सांगितले.

नेहरू युवा केंद्र संघटनेने कचरा निर्मूलन आणि स्वच्छता यासाठी विशेषतः एकदा वापरून फेकून देण्याच्या प्रकारातील प्लॅस्टिकचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी 1 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा देशव्यापी स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम आयोजित केला आहे. एक महिना कालावधीचा हा कार्यक्रम म्हणजे केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने कचरा संकलन तसेच निर्मूलन, मुख्यतः प्लॅस्टिक कचरा निर्मूलन करण्याच्या उद्देशाने 1 ऑक्टोबर 2021 रोजी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग आहे. अशाच प्रकारचे अभियान काल मुंबईत गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात राबविण्यात आले.

या अभियानात 50 हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त साजऱ्या होत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आणि तेव्हापासून, या संदर्भात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. स्वच्छ भारत कार्यक्रम म्हणजे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या उपक्रमाचा नवे लक्ष्य आणि कटिबद्धतेसह पुढे करण्यात आलेला विस्तार आहे. देशातील युवा वर्ग आणि नागरिकांचे एकत्रित प्रयत्न तसेच सर्व भागधारकांकडून मिळालेला पाठींबा यांच्या बळावर आपल्या नागरिकांचे जगणे अधिक उत्तम स्वरूपाचे करता येऊ शकते. या अभियानाच्या पहिल्या 10 दिवसांमध्येच स्वच्छ भारत कार्यक्रमांच्या आयोजनातून देशभरात 30 लाख किलो कचरा संकलित करण्यात आला हे लक्षात घेण्यासारखे आहे.