वैजापूर तहसील कार्यालयाच्या निजामकालीन इमारतीची दुरावस्था
नवीन इमारतीचा 894 लक्ष रुपयांचा सुधारित प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे धूळखात पडून
वैजापूर ,१८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-
वैजापूर तहसील कार्यालयाच्या निजामकालीन इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून,तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचा 8 कोटी 94 लक्ष रुपयांचा सुधारित प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पडून आहे.सतत पाठपुरावा करून ही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
वैजापूर तालुका हा मराठवाड्याचे प्रवेशद्वार असून,या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ही इमारत कधीही पडू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली असून,तहसील कार्यालयातील कर्मचारी जीव मुठीत धरून सध्या काम करीत आहेत. तहसील कार्यालयाची नवीन इमारत व्हावी म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. सततच्या पाठपुराव्यामुळे 2012 साली तहसील कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी 1 कोटी 60 लक्ष रुपयांची मान्यता मिळाली होती. प्रशासकीय मान्यता मिळूनही तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम झाले नाही.8 कोटी 94 लक्ष रुपयांचा सुधारित प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आलेला असून, हा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे.
तहसील कार्यालयाची जुनी इमारत कधीही पडू शकते अशी सध्या परिस्थिती असून कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. पावसाळ्यात तहसीलची इमारत गळत असल्याने शासकीय दस्तावेजाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तहसील कार्यालयाच्या निजामकालीन इमारतीची सार्वजनिक बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल ऑडिट करून ही इमारत धोकादायक असल्याचा अभिप्राय दिलेला असूनही या इमारतीत कामकाज सुरू आहे.तहसील कार्यालयाच्या नवीन सुधारित प्रस्तावानुसार सध्या असलेल्या जुन्या जागेवरच एल आकाराची तीन मजली भव्य इमारत बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. नवीन इमारतीमध्ये तळ, पहिला मजला व दुसरा मजला अनुक्रमे 560.60 चौरस मीटर क्षेत्रफळ असून, एकूण 1681 चौरस मीटर क्षेत्रफळावर ही नवीन भव्य इमारत उभी राहणार आहे.
वैजापूर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या प्रस सुधारित प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे केली आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल शेळके,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज ठोंबरे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल निकम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गणेश पवार यांचा समावेश होता.