ई श्रम सेवा पोर्टलला नोंदणी करून विमा सेवेचा कामगारांनी लाभ घ्यावा-प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.आर.शिंदे

Displaying IMG-20211017-WA0113.jpg

वैजापूर ,१८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- कामगारांनी विमा सेवेचा लाभ घेण्यासाठी ई श्रम या सेवा पोर्टल ला नोंदणी करून घ्यावी .असे प्रतिपादन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.आर.शिंदे यांनी रविवारी (ता.17) महालगांव येथे असंघटित कामगार व त्यांचे कायदे या संदर्भात आयोजित मार्गदर्शन शिबिरात केले.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार “आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत  तालुका विधिसेवा समिती व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महालगाव (  ता.वैजापूर) येथे कामगारांना कायद्याची माहिती व्हावी यासाठी कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.आर.शिंदे होते.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे, विरगाव पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरवडे, कामगार संघटना औरंगाबादचे श्री.राजपूत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

Displaying IMG-20211017-WA0106.jpg

अध्यक्षीय भाषणात न्या. शिंदे यांनी जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्याबाबत तसेच असंघटित कामगार व त्यांच्या विषयीचे कायदे याविषयी  विस्तृत माहिती दिली. कामगारांनी विमा सेवेचा लाभ घेण्यासाठी ई श्रम सेवा पोर्टलला नोंदणी करून घ्यावी असे आवाहन केले.

या शिबिरास जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अनिल रोठे, कोषाध्यक्ष प्रफुल्ल पोंदे, एस.एस.ठोळे, विष्णू सवई, न्यायालयीन कर्मचारी बाबासाहेब मोटे,प्रशांत शिंदे, महालगांव ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र हरिदास यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम कोठारी यांनी केले तर मनोज भंडारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.