एमएसएलटीए आयटीएफ वरिष्ठ एस100 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नितीन किर्तने, हिमांशू गोसावी, राधिका कानिटकर यांना दुहेरी मुकुट

मुंबई,१७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए आयटीएफ वरिष्ठ एस100 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरी गटात अंतिम फेरीत नितीन किर्तने, हिमांशू गोसावी, राधिका कानिटकर या खेळाडूंनी दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरी गटातही विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. 
डॉ.जी.ए. रानडे टेनिस सेंटर, मुंबई येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत 35 वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत रमझान शेखने आनंद कोठारीचा 6-4, 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर, याच महिला गटात राधिका कानिटकर हिने 3 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद पटकावले. 
45 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित नितीन किर्तने याने तिसऱ्या मानांकित दशरथ साळवीचा 6-1, 6-0 असा एकतर्फी पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 55 वर्षांवरील गटात हिमांशू गोसावीने गजानन कुलकर्णीचा 6-0, 6-0 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. 65 वर्षांवरील गटात राजीव वालियाने दुसऱ्या मानांकित विनायक गुजराथीचा 6-1, 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई व राजीव देशपांडे, एमएसएलटीएचे खजिनदार सुधीर भिवापुरकर, एमएसएलटीएचे समिती सदस्य शिव मोर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य, स्पर्धा निरीक्षक लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 35 वर्षावरील पुरुष गट: 
अंतिम फेरी: रमझान शेख(भारत)वि.वि.आनंद कोठारी(भारत)6-4, 6-0;
महिला 35 वर्षांवरील एकेरी गट: राउंड रॉबिन: विजेती: राधिका कानिटकर(3गुण);उपविजेती: मीनाक्षी आहुजा(2गुण);
45वर्षांवरील पुरुष गट: अंतिम फेरी: नितीन किर्तने(भारत)(1) वि.वि.दशरथ साळवी(भारत) 6-1, 6-0;
55 वर्षांवरील पुरुष गट:अंतिम फेरी: हिमांशू गोसावी(भारत)वि.वि.गजानन कुलकर्णी(भारत) 6-0, 6-0;
65 वर्षांवरील गट: अंतिम फेरी: राजीव वालिया(भारत)वि.वि.विनायक गुजराथी(भारत)(2) 6-1, 6-0.