स्वच्छता मोहिमेला महाराष्ट्रात मोठे यश,महिनाभरात 5 लाख किलो कचरा संकलन आणि त्याच्या विल्हेवाटीचे उद्दिष्ट

मुंबई, १६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-

केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत,  नेहरु युवा केंद्र संघटना   आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून 1 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात युवकांच्या सहभागातून आतापर्यंत 3,03, 038 किलो कचऱ्याचे संकलन करुन त्याची  विल्हेवाट लावण्यात आली आहे , ,अशी माहिती  नेहरु युवा केंद्राचे राज्य  संचालक प्रकाशकुमार मानुरे आणि राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र आणि गोवाचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन यांनी दिली. या अभियानाच्या आतापर्यंतची प्रगती आणि आगामी उपक्रम यांची माहिती देण्यासाठी आज एक व्हर्च्युअल पत्रकार परिषद आयोजितकरण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

या अभियानांतर्गत प्रत्येक गावातून दररोज 30 किलो कचरा संकलित करुन त्याचदिवशी त्याची  विल्हेवाट लावण्याचा संकल्प  आहे. त्यानुसार 4 लाख 59 हजार किलो कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे महाराष्ट्राचे  ऑक्टोबर महिन्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच त्याहून अधिक म्हणजे एकूण 5 लाख किलो कचऱ्याचे संकलन करुन विल्हेवाट लावण्यात येणार आहे.महाराष्ट्र आणि गोव्यातील 1331 गावांतून कचरा संकलनाचे उद्दिष्ट आहे. सध्या प्रतिदिन 452 गावांमध्ये अभियान राबवले जात आहे असे मानुरे यांनी सांगितले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आहे. राज्यात 49 हजार स्वयंसेवक मोहिमेत सहभागी आहेत. त्यांनी आतापर्यंत 47,608 किलो कचरा संकलन केले आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील 25 विद्यापीठांनी मोहिमेत सहभाग घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र आणि गोवाचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन यांनी दिली.

गोवा राज्यात 3,809 विद्यार्थी या मोहिमेत सहभागी आहेत. बस स्थानके, रेल्वे स्थानके यांची स्वच्छता. तसेच शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा, ऐतिहासिक आणि इतर महत्त्वाच्या स्थळांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येक एनएसएस युनिटने एक गाव दत्तक घेतले आहे. त्यात स्वच्छतेच्या जनजागृतीविषयी विशेष मोहीम राबवली जात आहे. अनेक एनजीओ, क्रीडापटूंचा मोहिमेत सहभाग आहे, असे डी. कार्तिकेयन यांनी सांगितले.

या मोहिमेत  नेहरु युवा केंद्र संघटनेच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील एकूण 1,10, 424 युवकांनी सहभाग घेतला आहे. त्यात आतापर्यंत 3,03,038 किलो कचरा संकलित करण्यात आला आहे तर 2,87,158 किलो कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. 459 ऐतिहासिक आणि इतर महत्त्वाच्या स्थळांची स्वच्छता करण्यात आली आहे. 1820 शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक स्थळांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे, असे सांगत  नेहरु युवा केंद्रातर्फे येत्या 18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील  गेटवे ऑफ इंडिया येथे स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे असे मानुरे यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या तीन जिल्ह्यांतील प्रतिनिधींना दिल्लीला  जाण्याची संधी मिळणार आहे. या प्रतिनिधींना  संसदेत होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यास मिळेल.

पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या सहाय्यक संचालक जयदेवी पुजारी-स्वामी यांनी पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक केले. तर, माहिती सहायक सोनल तुपे यांनी संचलन आणि आभार प्रदर्शन केले.

स्वच्छ भारत अभियानाविषयी

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 1 ऑक्टोबर रोजी या  देशव्यापी स्वच्छता अभियानात भाग घेत या महिनाभर चालणाऱ्या अभियानाची सुरुवात केली.

नागरिकांच्या स्वयंस्फूर्त सहभागाच्या पाठबळावर या अभियानाच्या आयोजनातून 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 या महिन्याभरात देशभर 75 लाख किलो कचरा, विशेषतः प्लास्टिक कचरा संकलित करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

देशभरातील विविध ऐतिहासिक/ प्रसिद्ध स्थळे आणि पर्यटकांचे आकर्षण असलेली ठिकाणे, बस स्थानके/रेल्वे स्थानके, राष्ट्रीय महामार्ग तसेच शैक्षणिक संस्था अशा महत्त्वाच्या आणि गर्दीच्या जागी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचऱ्याचे संकलन, गावांचे सुशोभीकरण, पारंपरिक जलस्रोतांची स्वच्छता या उपक्रमांचा समावेश आहे.