केंब्रियन गस्त सरावात भारतीय लष्कराच्या संघाने जिंकले सुवर्णपदक

मुंबई ,१६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- युनायटेड किंगडमच्या वेल्स परगण्यातील ब्रेकॉन येथे 13 ते 15 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या केंब्रियन गस्त सरावात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 4/5 गुरखा रायफल्स (फ्रंटियर फोर्स)च्या संघाने सुवर्णपदक जिंकले आहे.

युनायटेड किंगडमच्या लष्करातर्फे आयोजित करण्यात आलेला हा केंब्रियन गस्त सराव म्हणजे मानवी सहनशक्ती आणि संघभावना यांची अत्युच्च चाचणी परीक्षा समजली जाते आणि जगभरातील लष्करी समुदायांमध्ये याला लष्करी गस्तीचे ऑलिम्पिक असे संबोधण्यात येते.

भारतीय संघाने या सरावात सहभागी होऊन एकूण 96 संघांशी मुकाबला केला. या संघांमध्ये जगभरातील विशेष लष्करी दले आणि अत्यंत सन्माननीय पलटणींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 17 आंतरराष्ट्रीय संघांचा समावेश होता.

या युद्धाभ्यासामध्ये सहभागी झालेल्या संघांनी अतितीव्र वातावरण असलेले भूभाग आणि असह्य थंड वातावरण यामुळे तोंड द्याव्या लागणाऱ्या आव्हानांचा सामना केला.  तसेच प्रत्यक्ष जगातील  गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले,  जेणेकरून प्रत्यक्ष रणभूमीवर या लष्कराचे प्रतिसाद कसे असतील याचे परीक्षण करता येईल.

भारतीय लष्कराच्या संघाची परीक्षकांनी भरघोस प्रशंसा केली, विशेषतः त्यांच्याकडील  दिशांच्या अचूक माहिती संबंधित कौशल्ये, गस्तीच्या आदेशांचे त्वरित पालन आणि एकंदर शारीरिक सहनशक्ती याबाबत त्यांचे कौतुक केले.

ब्रिटीश लष्कराचे चीफ ऑफ जनरल स्टाफ जनरल सर मार्क कार्लटन-स्मिथ यांनी 15 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या एका औपचारिक समारंभात भारतीय लष्कराच्या संघाला सुवर्णपदक प्रदान केले.

यावर्षीच्या सरावात सहभागी झालेल्या 96 संघांपैकी केवळ 3 आंतरराष्ट्रीय संघांना सरावाच्या 6 व्या फेरीपर्यंत पोचून सुवर्णपदक जिंकता आले.