शहीद सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी

गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांनी काळे कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन

सोलापूर, दि.२७: पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली.

पानगाव (ता. बार्शी) येथे शहीद सुनिल काळे यांच्या कुटुंबियांची आज श्री गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.शहीद काळे यांची भाची वर्षा काळे यांनी कुटुंबियांच्या स्थितीबद्दल माहिती दिली.  काळे कुटुंबिय जिरायती शेतीवर अवलंबून आहे मामीला आधार देण्यासाठी कोणी नाही, एकाला शासकीय सेवेत घेण्याची तिने यावेळी मागणी केली होती.  आम्हाला शहीद सुनिल काळे यांचा अभिमान आहे, शासन खंबीरपणे कुटुंबियांच्या पाठिशी असल्याची ग्वाही यावेळी गृहमंत्री श्री. देशमुख यांनी दिली.  

वीर जवानाचा आम्हाला अभिमान असून काळे कुटुंबाला आवश्यक  ती सर्व मदत शासन करेल, असे पालकमंत्री श्री. भरणे यांनी यावेळी सांगितले.  शासकीय मदतीबरोबर खास बाब म्हणून काळे कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत घेण्याचा प्रयत्न शासन करेल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.यावेळी ‍शहीद जवान सुनील काळे यांच्या आई कुसुम काळे, पत्नी अर्चना, मुले श्री आणि आयुष, भाऊ नंदकुमार आणि किरण काळे उपस्थित होते.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *