वैजापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 106 कोटी 24 लाखाची आर्थिक मदत

वैजापूर ,१५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-गेल्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान वैजापूर तालुक्यात झाले असून,राज्य शासनाच्या पॅकेजनुसार तालुक्यातील 1 लाख 30 हजार 187 शेतकऱ्यांना 106 कोटी 24 लाख रुपये आर्थिक मदत मिळणार आहे.

Displaying IMG-20211007-WA0182.jpg


जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गेल्या आठवड्यात वैजापूर तालुक्यातील बाधित गावांना भेट देऊन अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. बाधित क्षेत्राचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला केल्या तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी म्हणून शासनाकडे पाठपुरावाही केला.तालुक्यात 1 लाख 04 हजार 816 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.राज्य सरकारने 2 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय जाहीर केला असून या निर्णयानुसार वैजापूर तालुक्यातील1 लाख 30 हजार 187 शेतकऱ्यांना सुमारे 106 कोटी 24 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. यामध्ये जीरायतीसाठी 10 हजार रूपये,बागायतीसाठी 15 हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ही मदत 2 हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.