महाविकास आघाडी सरकारचे मदतीचे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा

भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांची टीका

मुंबई ,१४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज तुटपुंजे असून शेतकऱ्यांच्या गंभीर नुकसानीची दखल न घेताच जाहीर केलेले हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. ऐन दसऱ्याच्या आधी महाविकास आघाडी सरकारने संकटग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे, अशी टीका भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांनी केली.

            मुख्यमंत्री होण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेल्या मागणीइतकीही मदत त्यांच्या सरकारने जाहीर केलेली नाही, असेही ते म्हणाले.

            ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक उद्धवस्त झालेच पण त्यासोबत अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पीक घेणे अशक्य आहे. ही जमीन लागवडयोग्य करण्याचा मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पशुधन वाहून गेले. मनुष्यहानी झाली. फळ बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना झाडे पडल्यामुळे नव्याने लागवड केल्यावर अनेक वर्षे उत्पादन मिळणार नाही. तसेच मदत देताना दोन हेक्टरची मर्यादा घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत खूप कमी मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना या नुकसानीचा विचार केलेला नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.

            त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कमीत कमी हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत मागितली होती. तथापि, मुख्यमंत्रिपद मिळाल्यावर आपल्या मागणीनुसार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी त्यांनी तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. घराबाहेर पडून ते शेताच्या बांधावर गेले असते तर अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी कसा उद्धवस्त झाला आहे याची त्यांना जाणीव झाली असती.

            अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने २०१९ काढलेल्या आदेशाची ठाकरे सरकारने अंमलबजावणी करावी आणि चहुबाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.