मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राज्यातील उर्वरित सर्व १०६ तालुक्यांमध्ये राबविण्यास राज्य शासनाची मंजुरी – कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई,१४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-  विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रवण १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यातील सर्व तालुके, तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुके अशा एकूण २४४ तालुक्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबविण्यात येत होती. या योजनमध्ये राज्यातील उर्वरित सर्व १०६ तालुक्यांचा समावेश केला असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत  शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेमध्ये देय असलेल्या अनुदानाशिवाय अल्प व  अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांसाठी २५ टक्के व इतर शेतकऱ्यांसाठी ३० टक्के पुरक अनुदान राज्य शासनातर्फे अतिरिक्त अनुदान देण्यात येते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आता ही योजना उर्वरित सर्व तालुक्यात राबविण्यास मंजुरी दिली आहे.

राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये या योजने अंतर्गत अल्प व अत्यल्पभुधारक शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी ८० टक्के अनुदान तर इतर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देय राहणार आहे.