केंद्र सरकार काही यंत्रणांचा गैरवापर राजकीय हेतूने केला जात आहे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची टीका

मुंबई ,१३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- केंद्र सरकार काही यंत्रणांचा गैरवापर करण्याची पावले सतत टाकत आहे. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी, एनसीबी या सगळ्या यंत्रणांचा वापर राजकीय हेतूने केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे उदाहरण दिले.

May be an image of 4 people, people standing and text that says '제বर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण रस्ते वाहतुक महामार्ग मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन भूमिपूजन आणि लोकार्पण दि. ऑक्टोबर अहमदनगर'

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी देशमुख यांच्यावर काही आरोप केले. त्यातून सरकारविरोधात वातावरण निर्मिती झाली. ज्यांनी आरोप केले, ते गृहस्थ आज कुठेही दिसत नाहीत. एक जबाबदार अधिकारी बेछूटपणे आरोप करतो, असे कधी दिसले नव्हते. अनिल देशमुख यांनी आरोप झाल्यानंतर तात्काळ पदावरुन दूर जाण्याची भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला परमबीर सिंग यांच्यावर आता आरोपांची मालिका सुरु झाली आहे. हे आरोप होत असताना परमबीर सिंग मात्र गायब झाल्याचे दिसते, असे पवार म्हणाले.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर काल पाचव्यांदा छापा पडल्याचे कळले. पाच-पाच वेळेस एका व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांना पुन्हा पुन्हा काय मिळतं हे माहिती नाही. पण हा छापा टाकण्याचा यंत्रणांनी नवा विक्रम केला आहे. याचा विचार नागरिकांनीही करणे गरजे असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.
लखीमपुर खीरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मावळ घटनेचा दाखला दिला. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी समाचार घेतला आहे. मावळ घटनेचे खरे कारण हे त्यावेळी कोणाच्या नजरेत आले नाही. या घटनेत शेतकरी मृत्यूमुखी पडले मात्र या मृत्यूला जबाबदार कोणी राजकीय पक्षाचे नेते नसून तो आरोप पोलिसांवर करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी काही कारवाई केली होती. या घटनेला बराच काळ उलटून गेला. तरीही माजी मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तुलना लखीमपुर घटनेशी केली. मावळमधील शेतकऱ्यांवर पोलिसांकडून झालेल्या गोळीबारामुळे त्या भागात सत्ताधारी पक्षाबाबत एकप्रकारची नाराजी होती. मात्र आज घटनेतील सत्यता त्या भागातील लोकांसमोर आली आहे. मावळचे चित्र आज बदलले आहे. त्यावेळी मावळवासियांनी ज्यांच्यावर आरोप केले होते, त्यांचा या घटनेत काहीही हात नसल्याचे समोर आले. सत्ताधाऱ्यांचा या घटनेशी संबंध नव्हता याउलट परिस्थिती हाताबाहेर जावी यासाठी स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जनतेला भडकवले होते. मावळ तालुक्यात एकेकाळी जनसंघ आणि त्यानंतर भाजप निवडून येत होते. मात्र गोळीबार घटनेच्या काळात लोकांना भडकवण्याचे काम कोणी केले हे जनतेच्या लक्षात आल्यानंतर आताच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. सुनील शेळके हे ९० हजार मतांनी निवडून आले. जर मावळमध्ये अजूनही संताप असता तर एवढ्या मतांनी राष्ट्रवादीची जागा निवडून आली नसती, असा दावा पवार यांनी केला. त्यामुळे माजी मुख्यमंत्र्यांनी मावळच्या घटनेला उजाळा देऊन एकप्रकारे बरेच केले यातून मावळची मानसिकता आता काय आहे हे त्यांनी समजून घेतलं तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टोला शरद पवार यांनी फडणवीस यांना लगावला.

May be an image of 7 people, people sitting and people standing

दरम्यान, महाराष्ट्र बंदला दिलेल्या प्रतिसादाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे पवार यांनी आभार मानले.११ ऑक्टोबर रोजी लखीमपुर खीरी च्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने बंद पुकारला होता. तो बंद यशस्वी झाला याबद्दल शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायला हवे तसेच जनतेलाही धन्यवाद द्यायला हवेत. लखीमपुरमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्यांची दखल महाराष्ट्रातील जनता घेते ही चांगली गोष्ट आहे. मला उत्तर प्रदेशमधील काही सहकाऱ्यांचे फोन आले. उत्तर प्रदेशच्या घटनेबद्दल महाराष्ट्रातील लोक बंद पाळतात याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली, असे पवार म्हणाले.

May be an image of 2 people and people standing

पाऊस खूप चांगला झाल्याने ऊसाचे उत्पन्न अधिक

राज्यात १५ दिवसांनी साखर कारखाने सुरू होतील. यंदाच्या वर्षी पाऊस खूप चांगला झाल्याने ऊसाचे उत्पन्न अधिक आहे. ज्या पद्धतीने धरणं आता भरली आहेत, एकंदर स्थिती पाहिली तर पुढच्या वर्षी ऊसाची लागवड महाराष्ट्रात आणखी जास्त होणार आहे. त्यामुळे या वर्षी आणि पुढच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये ऊसाच्या उत्पादनाचा रेकॉर्ड ब्रेक होईल, असा अंदाज आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी वर्तविला. ऊस पुरवठा केल्यानंतर एकरकमी पैसे देण्यात यावे, अशी काही जणांची मागणी आहे. ही मागणी फार चुकीची आहे, असे मी म्हणणार नाही. पण यामध्ये सिस्टीम काय आहे हे पाहिले पाहिजे. गुजरातमध्येही सहकारी साखर कारखानदारी चांगली आहे. गुजरातमध्ये ऊस उत्पादकांना तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. महाराष्ट्रात एका कारखान्याने एकरकमी पैसे दिल्यानंतर तुकड्या-तुकड्यात पैसे न देता एकरकमी द्या, ही मागणी पुढे येतेय. पण यामागील अर्थकारण समजून घेतले पाहीजे, असे पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले की, “येत्या सात-आठ दिवसात १७५ च्या आसपास साखर कारखाने सुरू होतील. त्यांचा हंगाम तीन-साडेतीन महिन्यांचा असेल. तीन महिन्यात साखर निर्मिती होण्यास सुरूवात होईल. एवढी मोठ्या प्रमाणावर साखर जर बाजारात गेली तर बाजारपेठेत किंमती राहणार नाहीत आणि तशी मागणीही येणार नाही. त्यामुळे किंमती पडतील. या ऐवजी ही साखर १२ महिन्यात विकली म्हणजे पहिल्या टप्प्यात काही साखर विकली, त्यानंतर दसरा-दिवाळी सणाला साखरेची मागणी असते तेव्हा, त्यानंतर उन्हाळ्याच्या पूर्वी शीतपेये व अन्य गोष्टी तयार करण्यासाठी साखरेची मागणी असते अशी टप्पाटप्प्याने साखर विकली तर फायदा होतो. पण साखर एकदम विकली तर साठवणुकीचे संकट, कमी किंमत मिळण्याचे संकट निर्माण होते. माझी आग्रहाची विनंती आहे की, जे ही मागणी करत आहेत त्यांनी यामागील अर्थशास्त्र बघा, वर्षाचे गणित बघा, फायदा-तोटा नक्की काय होतो त्याचा ही विचार करा. तरच हा प्रश्न सुटेल.”कुवत नसताना दिले तर याचा अर्थ कर्ज काढून द्यावे लागेल. कर्ज काढले तर व्याजही द्यावे लागेल. कर्ज आणि व्याज या दोन्ही गोष्टी पाहिल्यानंतर शेवटी ही रक्कम कोण देणार? याचा भार कारखान्याच्या ऊस उत्पादकांवरच पडणार आहे. परिणामी कारखाने संकटात जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे नेतृत्व करणाऱ्या लोकांनी अतिरेक करू नये, अशी विनंती पवार यांनी केली. तसेच अवाजवी मागणी केल्यास मुंबईतील वस्त्रोद्योगासारखी स्थिती होऊ शकते, असेही ते म्हणाले. त्यावेळी कापड गिरण्यांबाबत चुकीच्या मागण्या केल्या गेल्या. त्यातून या गिरण्या बंद झाल्या. आम्ही आमच्या सहकाऱ्यांना विधिमंडळात सांगत होतो की ताणावं, पण तुटेल इतकं ताणू नये. पण ते तुटेपर्यंत ताणलं आणि त्याचा परिणाम आज मुंबईतला, महाराष्ट्रातला कापड धंदा जवळपास संपला आहे. ही अवस्था उद्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचं वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साखर उद्योगाची होऊ नये अशी अपेक्षा आहे. त्यामुळे याबाबत आग्रह करणाऱ्यांनी विचार करावा. चर्चेतून आपण मार्ग काढू शकतो. आपले सूत्र एक आहे की उत्पादकाला न्याय मिळायला हवा, त्याचे नुकसान होता कामा नये, असे पवार  म्हणाले.

बंद पडलेले साखर कारखाने काही नेत्यांनी खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. याचीही माहिती मी घेतली. महाराष्ट्रातील काही कारखाने बंद झाले होते. या संबंधी ऊस उत्पादकांच्या तीव्र भावना होत्या. काही लोक कोर्टात गेले. हायकोर्टाने ऑर्डर काढली की, बंद झालेले कारखाने सुरू करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. ते कारखाने चालवायला द्यावे, लीजने द्यावे किंवा विकावेत. या सर्व सूचना हायकोर्टाच्या होत्या. या सूचना आल्यावर सरकारी बँका आणि राज्य सरकारला या संबंधीचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर बंद पडलेले कारखाने सुरू करण्यासाठी काही लोक पुढे आले. बऱ्याच ठिकाणी हे कारखाने लीजवर दिले आहेत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या ऊसाची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था झाली. याबाबत तेथील शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार नाही. अगदी यावर तेथे मतदान घेतले तरी ऊस उत्पादकांची भावना काय आहे, हे स्पष्ट होईल. असे आर्थिक निर्णय घ्यावे लागतात त्याचे एकूणच परिणाम काय होतात हे लक्षात घेऊन भूमिका घ्यावी लागते. एखादी गोष्ट बंद करायला फारशी अक्कल लागत नाही तर सुरू करायला आणि सुरू ठेवायला अक्कल लागते. अर्थव्यवस्थेचे चक्र कसे सुरू राहील याबद्दल खबरदारी घ्यायची आवश्यकता असते, असेही पवार  म्हणाले.

केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून काही लोक बदनाम

केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून काही लोकांना बदनाम केले जात आहे. श्री. नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर काही गोष्टी मांडल्या आहेत. त्यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबाबत काही मत व्यक्त केले. मी त्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. याआधी ते विमानतळावर कार्यरत होते, तिथल्याही काही कथा माझ्यावर कानावर आल्या. मात्र त्यावर मी आताच भाष्य करु इच्छित नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज पत्रकार परिषदेत म्हणाले.

एनसीबीने गेल्या काही वर्षात कारवाई करुन जप्त केलेल्या अमली पदार्थांचे प्रमाण अतिशय कमी आहे. याउलट महाराष्ट्राच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कितीतरी अधिक पटीने अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यामुळे राज्याची यंत्रणा हे दिलेले काम प्रामाणिकपणे, सखोलपणे करते. तर केंद्रीय यंत्रणा फक्त आम्ही काहीतरी करतो हे केंद्राला माहिती देण्यापुरते करते, हे त्यांच्या कारवाईवरुन दिसून येत असल्याची टीका पवार यांनी केली. तसेच गोसावी नामक एका व्यक्तीला पंच म्हणून एनसीबीने घेतले आहे. प्रशासनाने केलेली कारवाई योग्य आहे हे दाखविण्यासाठी चांगल्या चारित्र्याची माणसे पंच म्हणून घेतली जातात. पंच म्हणून निवडलेली व्यक्ती फरार आहे. याचा अर्थ त्याची इंटेग्रिटी संशयास्पद आहे, असे पवार म्हणाले. याच्यापेक्षाही गंभीर गोष्ट म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तीची पंच म्हणून निवड केली त्या अधिकाऱ्यांचे संबंध कुठल्या वर्तुळाशी आहेत, हे यातून दिसून आले. एखाद्या यंत्रणेवर आरोप केल्यानंतर संबंधित यंत्रणा बाजू मांडण्यासाठी पुढे येत असेल तर ठीक आहे. पण भाजपच सर्वात पुढे येऊन बाजू मांडताना दिसले. हे सर्वांसाठीच नवीन आहे. एखाद्या यंत्रणेकडून गैरवापर होत असेल व त्यांची बाजू मांडण्यासाठी भाजपचे लोक पुढे येत आहेत, ही गंभीर बाब असल्याचे पवार म्हणाले.

फडणवीस यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्याचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. फडणवीस यांना अजूनही ते मुख्यमंत्री असल्याचे वाटते याबद्दल पवार साहेबांनी त्यांचे अभिनंदन केले. मागील पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर अजूनही आपण सत्तेत आहोत याचे विस्मरण त्यांना होत नाही ही जमेची गोष्ट आहे, मी चार वेळा मुख्यमंत्री होतो तरीही माझ्या लक्षातही नाही, असा टोला पवार यांनी फडणवीस यांना लगावला.

याआधीही फडणवीस यांनी मी पुन्हा येईल हे विधान केले होते. या विधानानंतर सत्तेत न येण्याच्या व राज्यात सत्ता स्थापन न केल्याच्या वेदना किती सखोल आहेत हे आता दिसत आहे असे पवार म्हणाले. सत्ता येते, सत्ता जाते याचा फार विचार करायचा नाही. सत्तेत असताना त्याचा समंजसपणे लोकांच्या भल्यासाठी वापर करावा. याउलट सत्ता नसेल तेव्हा विरोधी पक्ष नेता व आपण मंत्री असताना घेतलेल्या निर्णयाचे वास्तव चित्र आणि मिळणारे आभार यात फार अंतर असते. त्यामुळे सत्तेत नसताना याची प्रचिती घेण्याची संधी असते असा सल्ला त्यांनी दिला. मात्र इथे काही वेगळी परिस्थिती पाहायला मिळत असल्याचे ते म्हणाले.