वैद्यकीय क्षेत्राला काळिमा;अखेर डॉ.आर.डी.शेंडगे व बनसोडेवर गुन्हा दाखल

उमरगा ,१३ ऑक्टोबर /नारायण गोस्वामी

बनावट कागदपत्रे तयार करून रुग्णांची आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे यांच्यासह तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सहायक पोलिस निरीक्षक गोरे करीत आहेत.

विशेष म्हणजे या प्रकरणात बनसोडे याने डॉ शेंडगे यांच्या कृत्याचा भांडाफोड करीत पुराव्यासह लेखी तक्रार केली होती त्यात चौकशी समितीत तथ्य सापडल्याने या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह गुन्हा नोंद झाला आहे. डॉ शेंडगे यांनी 2015 पासुन 6 सप्टेंबर 2019 पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करीत विमा कंपनीकडुन लाखो रुपयांचे बिल हडप केले. 

आर डी शेंडगे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे लॅब ब्लड रिपोर्ट गरजेनुसार कमी जास्त म्हणजे चुकीचे बनविल्या प्रकरणी व रुग्ण ऍडमिट नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडून वैद्यकीय बील उचलल्या प्रकरणी उमरगा येथील डॉ शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे व तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे यांना त्रिसदस्यीय चौकशी समितीने दोषी ठरविले आहे. चौकशी समितीने या घोटाळ्या प्रकरणी चौकशी अहवालानुसार पोलिसात तक्रार द्यायचा प्रयत्न केला होता माता त्यावेळी गुन्हा नोंद झाला नव्हता . अखेर त्यात गुन्हा नोंद झाला आहे.
कोडवर्ड – असा घोळ घालून लुटत होते 
डॉ शेंडगे हे रुग्णाचे नाव व कोडवर्डच्या खुणा चिट्ठीवर करून द्यायचे, एक बाण, दोन बाण , तीन बाण वरच्या बाजूला असल्यास सादर रुग्णाचे ब्लड रिपोर्ट अहवाल हे वाढवून द्यायचे व खाली बाण केलेला असल्यास त्याचे तपासणी निष्कर्ष कमी द्यायचे असे सांकेतिक भाषेत ठरले होते. प्लस चिन्ह लिहल्यास पॉझिटिव्ह व मायनस चिन्ह लिहल्यास निगेटिव्ह असे समजून तसे रिपोर्ट देण्यास मला भाग पाडत असत. या रुग्णालयाावर माझी उपजिवीका असल्याने मी हे रुग्णाचे खोटे अहवाल दिले असल्याचा कबुली जबाब बनसोडे यांनी तक्रारीत व चौकशी समितीसमोर दिला होता. हा चौकशी अहवाल डॉ आर यु सूर्यवंशी, डॉ सीमा बळे व डॉ रोचकरी यांच्या त्रिसदस्यीय समितीने दिला होता.
बनसोडेलाच लुटले म्हणून झाला भांडाफोड
डॉ शेंडगे हे करीत असल्याच्या कृत्याचा फटका जेव्हा बनसोडेला बसला तेव्हा त्याने तक्रार केली. डॉ शेंडगे यांनी बनसोडे आजारी नसताना आजारी असल्याचे कागदोपत्री दाखवून त्याच्या नावाने विमा कंपनीकडुन वैद्यकीय बिल उचलले त्यानंतर बनसोडे व डॉ शेंडगे यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि सर्व भांडाफोड झाला.

रुग्णालयाची परवानगी व योजना रद्द करण्याची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकरांची शिफारस

७ महिने झाले अद्याप अमलबजावणी नाही

उस्मानाबाद जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी ८ वेगवेगळ्या मुद्यात शेंडगे रुग्णालयाला आर्थिक लूट व चुकीच्या पद्धतीने वैद्यकीय सेवा देऊन रुग्णाची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे. ज्यात सरकारी योजनेचा लाभ घेऊनही जादा बिल आकारणे , नियमात असतानाही उपचार नाकारणे, रक्तचाचणीचे लॅबचे अतिरिक्त बिल आकारणे, रुग्ण तात्पुरत्या स्वरूपाची कृत्रीम श्वसन यंत्रणेवर असल्याचे भासवून जादा रकमेचे पॅकेज घेणे व नंतर रुग्णाला सामान्य विभागात पाठविणे,एकच बनावट तपासणी रिपोर्ट जोडून (एबीजी) वेगवेगळ्या रुग्णाचे फुले योजने अंतर्गत इन्शुरन्स पॅकेज घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करणे याचा समावेश आहे.शेंडगे रुग्णालयात रुग्णांवर उपचाराच्या नावाखाली सुरु असलेल्या आर्थिक लुटीसह अनेक गैरप्रकाराचा लेखी अहवाल जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व राज्य सरकारकडे केली आहे.

तक्रारींचे स्वरूप गंभीर असल्याने सेवास्तर करारनुसार रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकारी यांनी केली आहे. अनेक रुग्णांनी केलेल्या तक्रारी व महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजना आणि एम डी इंडिया इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी लेखी अहवाल लिहला आहे. रुग्ण सरोजाबाई बळीराम कांबळे या रुग्णाला आयसीयूमध्ये ऍडमिट केल्याचे भासवून योजनेतून पैसे लाटले. रुग्ण याकूब आलुरे यांच्याकडून योजनेतून उपचार देऊनही त्यांच्याकडून १२ हजार १८० रुपये अतिरिक्त आकारले तसेच रुग्ण सुलताना सैफन शेख यांच्याकडून ४० हजार व रुग्ण विजय भीमा जाधव यांना योजनेत उपचार देऊन सरकारकडून पैसे घेतले व रुग्णाकडून ९२ हजार घेतले. शेंडगे रुग्णालयाचे हे कृत्य महात्मा फुले योजनेच्या कलम ६.१ , ६.२ , २७. १ (सेवा स्तर करार) यांचे उल्लंघन असल्याचा अहवाल दिला आहे.

 शेंडगे रुग्णालयाने एकाच प्रकारची चूक वारंवार केली असल्याचे निदर्शनास आले असल्याने या रुग्णालयाची महात्मा ज्योतिबा फुले योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची संलग्नता रद्द करणे व रुग्णालया ाविरुद्ध तक्रारीचे स्वरूप गंभीर आहे त्यानुसार रुग्णालयााचे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा २००६ अंतर्गत परवाना रद्द करणे यासाठी कार्यवाहीची शिफारस जिल्हाधिकारी तथा फुले योजनेचे जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली आहे.