वैजापूर शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत, पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात पोलिस निरीक्षकासह अठरा जण जखमी

वैजापूर ,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून वैजापूर शहरात मोकाट कुत्रे टोळीने फिरतांना दिसत असून, एका पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात पोलीस निरीक्षकासह अठरा जण जखमी झाले. शहरात फिरणाऱ्या या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
शहरातील टिळक रोड, गांधी रोड व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे.रात्रीच्यावेळी ही मोकाट कुत्रे शहरातील विविध भागात टोळीने फिरताना दिसतात. या मोकाट कुत्र्यांमधील एका पिसाळलेल्या कुत्र्याने दोन दिवसापूर्वी शहरात अनेकांना चावा घेऊन दहशत निर्माण केली.या पिसाळलेल्या कुत्र्याने प्रथम शहरातील टिळक रस्त्यावर एका वृद्धास चावा घेतला. त्यानंतर शहरातील विविध भागातील नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. या घटनेमुळे शहरात दहशत निर्माण झाली होती.
पिसाळलेल्या या कुत्र्याला मारण्यासाठी नागरिकांचा जमाव जमा झाला.कुत्र्यांचा शोध घेऊन लाडगांव रस्त्यावर त्याला जमावाने ठार मारले.पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने पोलीस निरीक्षक साम्राटसिंग राजपूत यांच्यासह साईनाथ बोडखे,श्रेयस राजपूत,ऋतुराज बरबडे, अनिस कुरेशी, शोएब शाह, सुरेश आंबेकर,उमंग श्रीवास्तव, अबुजर पठाण, विठ्ठल कदम,आकाश फुलारे, महमद सौदागर,अमिरुद्दीन शेख,नितीश कदम,अजय धसे,अमन शाह,शिवराम पवार, लक्ष्मण त्रिभुवन आदी जखमी झाले.जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.