जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करा – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

गृहमंत्र्यांनी घेतली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची राज्यातील गुन्ह्यांसदर्भात आढावा बैठक

मुंबई,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणे तसेच यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी राज्यातील पोलीस यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यातील गुन्ह्यांसंदर्भात आढावा बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, संजय वर्मा, अनुपकुमार सिंग, विनय कारगावकर, सुहास वारके, विशेष पोलीस महानिरिक्षक रविंद्र सेनगांवकर, सह आयुक्त मिलींद भारंबे, विश्वास नांगरे-पाटील यांसह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री.वळसे पाटील म्हणाले की, अलिकडच्या काळात घडणाऱ्या घटनांमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी पोलिसांनाच प्रयत्न करावे लागतील.  त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आपल्या कामगिरीवर समाधानी न राहता यंत्रणेतील शेवटच्या घटकाने जनतेप्रती संवेदनशील राहण्यासोबतच संवाद आणि संपर्क वाढविण्याची गरज आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच कामगिरी सुधारण्यासाठी आपुलकीची भावना आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात गुन्हे घडतात त्याचा तपास पूर्ण होतो. परंतु वर्षानुवर्षे न्यायालयात खटले सुरू राहतात. न्यायालयात प्रलंबित असलेल्या अशा खटल्यांचा मागोवा घेऊन आरोपीला शिक्षा होण्याबरोबरच त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी दक्ष रहावे. कोणत्याही घटनेचा तपास, गुन्हा नोंद अथवा अन्य अनुषंगीक कार्यवाही व कारवाई विहित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना श्री. वळसे पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच सर्व यंत्रणेनी नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने कर्तव्य पार पाडले पाहिजे. तसेच सज्जतेवर भर दिला पाहिजे असेही स्पष्ट केले.

आज तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल घडून आणलेला आहे. याचा परिणाम म्हणजे कल्पकतेचा वापर करून मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडताना आढळत आहेत. पोलिसांनी सायबर सुरक्षेसाठी नवनवीन प्रयोग, संशोधन आणि तसेच गुन्हे उकल करण्याच्या विविध पद्धतीचा वापर करण्यावर भर देण्यात यावा. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या छोट्या-छोट्या स्वरुपाच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही केली तर जनतेच्या मनातील पोलिसांबद्दलचा विश्वास वाढेल आणि त्यातूनच मोठ्या स्वरुपाचे गुन्हे टाळता येणे सहज शक्य होईल. यासाठी प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

श्री.वळसे पाटील यांनी राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा आढावा घेतला. एकूण गुन्ह्यांचे स्वरूप आणि माहिती घेतली असता परिचित व्यक्तींकडूनच गुन्हे घडल्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येत आहे. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या महिलेची तात्काळ तक्रार नोंदवून घेण्यात यावी तसेच त्यांना योग्य तो दिलासा व विश्वास देण्यात यावा. तसेच या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन जलदगतीने तपास पूर्ण करून संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून  दक्षता समित्या नव्याने कार्यन्वित करण्याचे  निर्देशही यावेळी दिले.

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तसेच व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही श्री वळसे पाटील यांनी सांगितले.

आज झालेल्या या बैठकीत गृहमंत्र्यांनी मुंबई शहर व राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. मागील काही वर्षातील गुन्ह्यांची आकडेवारी व विश्लेषण तसेच गुन्हेगारीमध्ये होणारी वाढ नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

अंमली पदार्थाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच NDPS कायद्यांतर्गत करण्यात येणाऱ्या कारवाईबाबतही सविस्तर आढावा घेतला. तसेच महिला अत्याचार संबंधित गुन्हयांचा तसेच कारवाईबाबत देखील सविस्तर आढावा घेण्यात आला.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस दलाची कार्यक्षमता व कामगिरी अधिक प्रभावी करण्यासाठी सुचनांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगितले.