सेवानिवृत्ती हा जीवनातला स्वल्प विराम – सलिल पेंडसे

वाढदिवस न साजरा करता बजाजचे कामगार बंधू करतात अनाथ संस्थांना मदत 

औरंगाबाद ,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-

बजाज ऑटो लि. मधील एमसीडी विभागातील सोशल व कल्चरल प्रोग्राम कमिटीतर्फे दरवर्षी विविध सामाजिक स्तुत्य उपक्रम राबवले जातात. अॅल्युमिनियम मशीन शॉप मधील कामगार बंधु आपला वाढदिवस शॉप मधे मिठाई न वाटता कमिटी जवळ तो निधी स्वरूपात जमा करतात. त्यातूनच दरवर्षी अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या तीन ते चार सामाजिक संस्थांना उपयोग होईल अशी आवश्यक सामुग्री दिली जाते. गेली अनेक वर्षे हा उपक्रम सातत्याने केला जातो. तसेच दरवर्षी सेवानिवृत्त होण्याऱ्या कामगार बंधूंचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात येतो.

रविवारी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतातील सुप्रसिद्ध सॉफ्ट स्किल्स कोच व व्यवस्थापन सल्लागार सलिल पेंडसे यांना आमंत्रित केले होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना सलिल पेंडसे यांनी सांगितले की सेवानिवृत्ती हा जीवनात पूर्ण विराम नसतो तर स्वल्प विराम असतो. सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्ती म्हणजे समाजातील अनुभवांनी समृद्ध व विचारांनी परिपक्व झालेले आधारवड असतात. समाजाला त्यांची नितांत आवश्यकता असते. रोजगाराच्या शोधात येणाऱ्या तरुण पिढीला त्यांचे मार्गदर्शन मोलाचे असते. तसेच औरंगाबाद मधील अनेक लघु उद्योगातील अकुशल कामगारांना टी.पी.एम. फाइव एस सारख्या सिस्टम्स कोच म्हणून शिकवू शकतात.

मसिआ सारख्या संघटना तरूणांमधील कौशल्ये विकसीत व्हावीत म्हणून प्रकल्प राबवित आहेत. त्यांच्या या प्रकल्पात सेवानिवृत्त व्यक्ती आपले योगदान देवू शकतात. सेवानिवृत्ती नंतरचे जीवन आनंदी कसे करावे यावर श्री. पेंडसे यांनी सहज सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले.

यावेळी अर्जुन रसाळ यांनी सेवा, संघटन आणि समाजिक बांधिलकी यावर आपले विचार मांडले. श्री. योगेश बोरोले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमात २० सेवानिवृत्त कामगार बंधूंचा सत्कार करण्यात आला. ओंमकर बालगृह सातारा तांडा या संस्थेला रुपये २०,००० चे अन्नधान्य व किराणा देण्यात आला.

सुभाषचंद्र सिल्लारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूसाहेब लगड यांनी केले तर मधुकर मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी व्यासपीठावर युनियन शॉप प्रतिनिधी जितेंद्रसिंह राजपूत, दिनेश राऊत व इंद्रकुमार जाधव उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील साळी, संजय खलोलकर, राजू धनाईत, संजीव पाटील, अशोक गणगे, बाळासाहेब जाधव,गणेश देवरे,संजय शास्त्री, गुणवंत हंगरगेकर, प्रतिक्षा लगड, रेवती खलोलकर, शरदराव कुलकर्णी, रमेश चोपणे, मारोती आवलगावे, मोहनराव गिरी यांनी परीश्रम घेतले. यावेळी बजाज ऑटो लि. मधील १५० कामगार बंधु कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यकमांचा समारोप झाला.