पुरात वाहून गेलेल्या बोरसर येथील महिलेच्या कुटुंबियांना शासनातर्फे चार लाखांची मदत

वैजापूर ,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात २७ व २८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बोरसर येथील मंगल जनार्दन पठारे (वय ५३ वर्ष) या महिलेच्या कुटुंबियांना शासनातर्फे ४ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली.

आ. रमेश पाटील बोरणारे व तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या हस्ते सोमवारी(ता.११) मदतीचा धनादेश पठारे कुटुंबियांना देण्यात आला.सप्टेंबर महिन्याच्या २८ तारखेला तालुक्यातील  बोरसर व परिसरात मोठा पाऊस झाला.त्यामुळे या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती.पोलीस व प्रशासनाने मदत कार्य करून अनेक कुटुंबाना  सुरक्षितस्थळी हलविले होते.ढेकू नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बोरसर येथील मंगलबाई जनार्दन पठारे (५३ वर्ष) ही महिला वाहून गेली होती.चार दिवसानंतर या महिलेचा मृतदेह सापडला होता.

शासनातर्फे या महिलेच्या कुटुंबियांना सोमवारी मदतीचा धनादेश आ.रमेश पाटील बोरणारे व तहसीदार राहुल गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला.मृत महिलेचा मुलगा सागर जनार्दन पठारे याने धनादेश स्विकारला. नगरसेवक स्वप्नील जेजुरकर, ह.भ.प. दौलत महाराज,श्रीराम गायकवाड,पारस पेटारे, योगेश पुंडे,अरुण होले यावेळी उपस्थित होते.