आयकर खात्याच्या छाप्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीचा बंद

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची टीका

मुंबई ,११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राज्यात गेले पंधरा दिवस चालू असलेल्या आयकर विभागाचा छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने बंदचे आवाहन करण्यात आले. तथापि, जनतेचा मनापासून प्रतिसाद नसल्याने बंद फसला आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून पुकारलेल्या या बंदच्या विरोधात भाजपाची व्यापार आघाडी न्यायालयात गेली असल्याची माहिती त्यांनी दिली.

            आजच्या बंदसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वप्रथम घोषणा केली. नेहमीप्रमाणे आघाडीतील इतर सर्वांना फरफटत जावे लागले. शिवसेनेलाही सत्ता टिकविण्यासाठी पवारांचे ऐकावे लागले, असा टोला त्यांनी हाणला.

             चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, उत्तर प्रदेशात लखीमपूर खिरी येथील घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही. पण त्याचे निमित्त करून राज्यात महाविकास आघाडीने पुकारलेला बंद हा शेतकऱ्यांबद्दलच्या कळवळ्यासाठी नाही तर राज्यात गेले पंधरा दिवस राजकीय नेत्यांशी संबंधित आस्थापनांवर चालू असलेल्या आयकर खात्याच्या छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पुकारलेला आहे. कोरोनामुळे आधीच लोक त्रस्त असताना जनमताच्या विरोधात बंद पुकारण्यात आला आहे. आपण त्याचा निषेध करतो.

            ते म्हणाले की, नवरात्री उत्सवामुळे मोठ्या संख्येने लोक मंदिरात जाण्यासाठी रस्त्यावर आले पण त्यांची बंदमुळे गैरसोय झाली, व्यापाऱ्यांची अडचण झाली आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले. बंदमुळे जनतेमध्ये उद्रेक झाला असून त्याचे पडसाद आगामी निवडणुकात दिसतील. जनतेवर अशा प्रकारे बंद लादता येणार नाही, अशा स्वरुपाचे निर्देश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याच्या आधारे भाजपाच्या व्यापार आघाडीने महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

            त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीला शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता नाही. राज्यात वादळांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या आघाडीने मदत केली नाही. अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली नाही. मराठवाडा आणि विदर्भात तर अतिवृष्टीमुळे शेती खरडून गेली. त्याबद्दल महाविकास आघाडी काही बोलत नाही आणि उत्तर प्रदेशातील घटनेबद्दल महाराष्ट्रात बंद पुकारत आहे.

              ते म्हणाले की, मावळमध्ये पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर त्या वेळच्या काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या पोलिसांनी गोळीबार केला. शरद पवार मुख्यमंत्री असताना आरक्षणासाठी मोर्चा काढणाऱ्या गोवारी समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला व चेंगराचेंगरीत ११४ जण मरण पावले. उत्तर प्रदेशात लखीमपूर येथील घटनेला जबाबदार आरोपींवर चौकशीअंती न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षा होईल. पण महाराष्ट्रात ज्या प्रकारे काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारने पोलिसांकडून अत्याचार केला तसा प्रकार लखीमपूरला झालेला नाही. त्या घटनेसाठी उत्तर प्रदेश सरकार, केंद्र सरकार किंवा भाजपाला जबाबदार धरणे पूर्णपणे चुकीचे आहे. 

अन्नत्याग करणाऱ्या लातूरच्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून

आघाडी सरकारला लखीमपूरच्या शेतकऱ्यांचे बेगडी प्रेम

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

BJP lashes out at Thackeray, says ' 11 month old government...' | NewsTrack  English 1

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी दिसत नाहीत का, असा खोचक सवाल प्रदेश भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

          अतिवृष्टी आणि महापुरासोबतच मानवनिर्मित संकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्यातील शेतकरी आज अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. लातूर येथे मांजरा धरणाचे पाणी चुकीच्या पद्धतीने सोडल्यामुळे पाऊस थांबल्यानंतरही असंख्य शेतक-यांच्या शेतात पाणी शिरले. त्यातून सोयाबीन सारखी पिके उद्ध्वस्त झाली. या शेतक-यांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारकडून मिळालेली नाही. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 72 शेतकरी 72 तासांसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसले असून पंचक्रोशीतील गावांनी चूल बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला हजारो गावकरी पाठिंबा देण्यासाठी जमत असून भारतीय जनता पार्टीचे आमदार संभाजी पाटील तसेच रमेश कराड हे उपस्थित आहेत.

          एकिकडे शेतक-यांना शेतकरी प्रेमाचे उमाळे दाखवणारे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या एकाही नेत्याने या गावक-यांना भेटण्याचे सौजन्यही दाखवले नाही. तसेच लातूरला अतिवृष्टीला मिळालेली मदत ही शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसणारी ठरली आहे.

          लातूरसारखाच महाराष्ट्रातला शेतकरी हलाखीने त्रस्त असताना, हाताची घडी घालून व सर्वसामान्य जनतेस वेठीस धरून उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यास पाठिंबा देणाऱ्या सरकारने लखीमपूर दुर्घटनेचेही राजकारण सुरू केले आहे, असा आरोप त्यांनी केला. बळाचा, सरकारी यंत्रणेचा आणि सरकारच्या आशीर्वादाने गुंडगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा वापर करून बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेत दहशत माजवू पाहात असून या बंदला जनतेचा तीव्र विरोध असल्याचे सकाळपासूनच्या अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले.

          लातूरमध्ये ७२ शेतकरी अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि शेकडो घरांमध्ये चूल बंद आंदोलन सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे पाठ फिरवून उत्तर प्रदेशातील घटनेवर बेगडी सहानुभूती दाखविणाऱ्या ढोंगी सरकारचे राजकारण उघडे पडले आहे, असे श्री उपाध्ये म्हणाले.