चीनचे अधिकारी द्विपक्षीय कराराचे काटेकोर पालन करतील -भारताची अपेक्षा

भारत आणि चीन यांच्यात वरीष्ठ कमांडरांच्या बैठकीची 13 वी फेरी

नवी दिल्‍ली, ११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-भारत आणि चीनच्या सैन्यातील कोअर कमांडर पातळीवरील अधिकाऱ्यांच्या बैठकीची 13 वी फेरी 10 ऑक्टोबर 2021 रोजी चुशूल-माल्डो सीमेवरील  भेटीच्या ठिकाणी पार पडली. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष सीमारेषेच्या प्रदेशातील काही उर्वरित समस्यांच्या बाबतीतील ठरावावर चर्चा करण्यावर लक्ष केंद्रित केले. द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करणे आणि सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी सतत प्रयत्न करणे या चीनच्या सैनिकांच्या कारवाया प्रत्यक्ष सीमारेषेवर निर्माण झालेल्या समस्यांना कारणीभूत आहेत याकडे भारतीय प्रतिनिधींनी लक्ष वेधले. म्हणून पश्चिम विभागात, प्रत्यक्ष सीमारेषेच्या परिसरात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी चीनच्या बाजूकडील सैन्याने उर्वरित सर्व ठिकाणी योग्य पावले उचलणे आवश्यक होते अशी भूमिका भारतीय अधिकाऱ्यांनी मांडली. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या नुकत्याच दुशान्बे येथे झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही देशांनी त्यांच्यादरम्यान असलेले उर्वरित विवाद लवकरात लवकर संपुष्टात आणावेत यावर एकमत झाले होते. या बैठकीतील  ठरावाच्या मार्गदर्शनानुसारच भारतीय बाजूने मत मांडले आहे. उर्वरित क्षेत्रांमध्ये अशा प्रकारच्या ठरावामुळे  द्विपक्षीय नातेसंबंधांची प्रगती होण्यास मदत होईल यावर भारतीय अधिकाऱ्यांनी या बैठकीत भर दिला. म्हणूनच, या बैठीमध्ये भारतीय अधिकाऱ्यांनी उर्वरित समस्या सोडविण्याच्या संदर्भात विधायक सूचना करून देखील चीनी अधिकाऱ्यांनी त्यावर संमती दर्शविली नाही आणि त्यांनी या संदर्भात कोणतेही भविष्यात नातेसंबंध सुधारण्याच्या दृष्टीने प्रस्ताव देखील मांडले नाहीत. म्हणून या बैठकीत या प्रदेशातील उर्वरित समस्या सोडविण्याच्या संदर्भात कोणताही ठराव होऊ शकला नाही. 

परस्परांशी संपर्क कायम ठेवण्यावर तसेच भूप्रदेशात स्थैर्य राखण्यावर देखील दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांचे एकमत झाले. चीनचे अधिकारी द्विपक्षीय करार आणि त्यासंदर्भातील सर्व नियमावलीचे काटेकोर पालन करून  द्विपक्षीय नातेसंबंधाचा एकूण दृष्टीकोन लक्षात घेतील आणि या प्रदेशातील उर्वरीत समस्या लवकरात लवकर सोडविण्याच्या दिशेने प्रयत्न करतील अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे.