नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना सूचित

नारंगी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी व अधिकाऱ्यांसोबत आ.बोरणारे यांची बैठक

वैजापूर ,१० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर शहर व तालुक्यात यावर्षी अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.नारंगी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे नुकसान झालेल्या नदीकाठच्या डवाळा,खंबाळा,किरतपुर व नगिना पिंपळगांव आदी गावांतील शेतकरी व संबंधित अधिकाऱ्यांची आ.रमेश पाटील बोरणारे यांनी शनिवारी (ता.9)  बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे या भागातील शेतीसह पिके वाहून गेली. कांदाचाळी, सेटनेटचे नुकसान झाले.विहिरी पडल्या तसेंच पशुधनाचेही नुकसान झाले.आ.रमेश पाटील बोरणारे यांनी आज अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना सूचित केले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप,माजी सभापती अंकुश हिंगे,नानासाहेब थोरात,बंडू पाटील जगताप,उद्धव बहीरट, सदाशिव निर्मळ, रावसाहेब मोटे, राहुल लांडे,तुकाराम न्हावले,संदीप मोटे, वैभव शेवाळे यांच्यासह परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.