केंद्रीय लोकसेवा आयोगाची आज 47 उपकेंद्रावर होणार परीक्षा

औरंगाबाद,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांच्या मार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रांवर आज रोजी सत्र-1 सकाळी 09.30 ते 11.30 व सत्र-2 दुपारी 02.30 ते 04.30 या कालावधीत 47 उपकेंद्रांवर होणार असून परिक्षेसाठी 14 हजार 504 उमेदवारांना प्रवेश देण्यात आलेला आहे. या परीक्षेच्या कामासाठी 1989 अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

            या आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा अथवा गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली असून परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवाराने प्रवेशप्रमाणपत्र व स्वत:च्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षामध्ये सत्र-1 सकाळी 08.30 ते 09.20 दरम्यान, सत्र-2 दुपारी 01.30 ते 02.30 दरम्यान परीक्ष उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॅाईंट पेन, मुळ ओळखपत्र, सॅनिटायझर बॉटल व पारदर्शक पाणी बॉटल या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही.

            उमेदवार त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्ल्युटुथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाज्याबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्ष केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारावर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षांकरिता बंदी घालण्यात येईल.

            परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली येथून आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदरी परीक्षेकरिता सर्व उमेदवारांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे. असे प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविल आहे.