उत्तम वक्ता होण्याकर‍िता आत्मविश्वास, अभ्यास, मनन आवश्यक : राज्यपाल

राज्यपालांनी युवकांना सांगितला उत्तम वाक्‍पटू होण्याचा मूलमंत्र

मुंबई, दि. २६ – उत्तम वक्ता होण्याकर‍िता आत्मव‍िश्वास व निर्भिडपणा महत्त्वाचा आहे. मात्र त्यासोबतच अभ्यास, श्रवण,मनन आणि चिंतनदेखील तितकेच आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी युवकांनी हे सर्व गुण प्रयत्नपूर्वक व‍िकसित केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

नैनिताल येथील कुमाऊॅं विद्यापीठातर्फे आयोजित “समयस्फूर्त वक्तृत्व कला” या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथून केले, त्यावेळी ते बोलत होते.

आत्मव‍िश्वास  नसल्यास आपली छाया देखील आपल्याला भिववित असते, असे सांगून सातत्यपूर्ण अभ्यास व आत्मव‍िश्वासाच्या मदतीने वक्तृत्व कला प्राप्त केली जाऊ शकते असे राज्यपालांनी सांगितले.

आपल्या महाव‍िद्यालयीन जीवनातील अनुभव सांगताना राज्यपाल म्हणाले, उत्तम वक्ता होण्याकर‍िता, उत्तम श्रोता होणे महत्त्वाचे असते. स्वाध्याय, मनन व चिंतनदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

वक्तृत्वासोबतच लेखन कलादेखील विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक विकसित केली पाहिजे, अशी सूचना राज्यपालांनी युवकांना  केली.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुमाऊॅं विद्यापीठाचे कुलगुरु डॉ एन के जोशी, प्रो. पी सी कव‍िदयाल, कार्यशाळेच्या संयोजिका आस्था नेगी तसेच  विविध ठिकाणांहून शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *