राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यकारभार आजही मार्गदर्शक- मुख्यमंत्री

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

मुंबई, दि. २६ :-  लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिवछत्रपतींचा वसा आणि वारसा सांभाळत सुराज्य आणि सुशासन आणले. त्यांचा राज्यकारभार आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत मार्गदर्शक असा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी अभिवादन केले आहे. तसेच सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राजर्षी शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या सुखासाठी कल्याणकारी स्वराज्याची पायाभरणी केली. शिवछत्रपतींचा हा वसा आणि वारसा राजर्षी शाहूंनी समर्थपणे पुढे नेत सुराज्य आणि सुशासन आणले. समाज परिवर्तनाच्या पुरोगामी चळवळींना बळ देतानाच शिक्षण, आरोग्य, औद्योगिक, सहकार, कृषी, सिंचन अशा क्षेत्रांनाही त्यांनी पाठबळ दिले. महिला सबलीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मोठ्या अशा वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे त्यांचे आरक्षणाचे धोरण आज जगाच्या अभ्यासाचा विषय ठरला आहे. राजर्षी शाहूंनी राज्यकारभार सदैव  लोकाभिमुख असाच केला. समता, बंधुता आणि सार्वभौमत्व या लोकशाही मूल्यांबाबत ते आग्रही होते. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत लोकराजा शाहूंचा राज्यकारभार मार्गदर्शक असा आहे. त्यानुसार वाटचाल करणे,हेच त्यांना जयंतीदिनी अभिवादन ठरेल. राजर्षी शाहूंना त्रिवार अभिवादन आणि त्यांना मानाचा मुजरा.

उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचे अभिवादन

पुणे दि.26:- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ज्येष्ठ नेते खा.शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या सोहळ्यास गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खा. गिरीश बापट, खा. श्रीरंग बारणे, खा. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड , पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक – उपमुख्यमंत्री अजित पवार
राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि. 26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक, पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक असून त्याच विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पुरोगामी, क्रांतिकारक विचार दिला. बहुजन समाजातील मुलांसाठी वसतिगृहे सुरु केली. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी धरणे बांधली. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे देशातील थोर समाजसुधारक होते.  महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक विचार त्यांनीच खऱ्या अर्थानं पुढे नेला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली, त्यांना प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा निर्मूलन, अस्पृश्यता निवारणाचं काम केलं. अनिष्ट प्रथा, वाईट रुढी, चुकीच्या परंपरांवर बंदी घातली. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत, आपल्या राज्यात त्यासंबंधीचा कायदा केला. सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक असलेले राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी, प्रगत, दूरदृष्टीपूर्ण विचारांमुळे नेहमीच आपल्यासाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले आहे.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार यंदा राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक, ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर झाल्यानं उपमुख्यमंत्र्यांनी डॉ. तात्याराव लहाने यांचंही अभिनंदन केलं आहे.

सामाजिक न्याय दिनानिमित्त महसूलमंत्र्यांच्या शुभेच्छा
सामाजिक न्याय दिनानिमित्त महसूलमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई दि. 26 : बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन  स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे, सामाजिक न्याय व आरक्षणाचे जनक, लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अभिवादन केले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या  जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक, पुरोगामी निर्णय घेतले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक असून त्याच विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे.  

राजर्षी शाहू महाराजांनी उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पुरोगामी, क्रांतिकारक विचार दिला. बहुजन समाजातील मुलांसाठी वसतिगृहे सुरु केली. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी धरणे बांधली. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे देशातील थोर समाजसुधारक होते.  सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक असलेले राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी, प्रगत, दूरदृष्टीपूर्ण विचारांमुळे नेहमीच आपल्यासाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *