देशातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देशातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

अमरावती जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील प्रकल्पाचे लोकार्पण

पीएम केअर फंडाच्या मदतीने देशात 1 हजारहून अधिक प्राणवायू निर्मिती प्रकल्प

अमरावती, ७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशाने अल्पावधीत आरोग्य सुविधांचा मोठा विस्तार केला. हे कार्य देशाची क्षमता व समस्त भारतीयांच्या बंधुभाव आणि एकतेचे प्रतिक आहे. पीएम केअर फंडाच्या मदतीने देशात 1 हजार 150 ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले असून, प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे, असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

पीएम केअर फंडातर्फे उभारण्यात आलेल्या देशभरातील 35 ऑक्सिजन प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. त्याचा मुख्य सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे झाला. अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील प्रकल्पाचाही त्यात समावेश असून,

यानिमित्ताने स्थानिक स्तरावर आयोजित कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा,आमदार प्रताप अडसड, महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी यावेळी उपस्थित होते.

कोरोना संकटकाळातील अडचणींवर अथक प्रयत्नांतून केलेली मात, विविध सुविधांची वेगाने निर्मिती आदी बाबींवर प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. ते म्हणाले की, कोरोना संकटकाळात देशाने अत्यंत थोड्या काळात गतीने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उभारल्या. रूग्णालये, प्रयोगशाळा, ऑक्सिजन निर्मिती, लसीकरण मोहिम अशा कितीतरी गोष्टींना चालना देण्यात आली. अत्यंत थोड्या काळात देशाने उभारलेले हे कार्य समस्त भारतीयांच्या बंधुभाव व एकतेचे प्रतिक आहे. वैद्यकीय प्राणवायूची गरज लक्षात घेऊन उत्पादनात दसपट वाढ कऱण्यात आली. भौगोलिक वैविध्य पाहता देशाच्या कानाकोप-यात ऑक्सिजनची वेगवान वाहतूक हे आव्हान होते. मात्र, भारताने ते यशस्वीरित्या करून दाखवले. वायूसेना व डीआरडीओने त्यासाठी योगदान दिले. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे मोठे नेटवर्क देशभर उभे राहिले असून, प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली आहे.

20 वर्षांपूर्वी याच दिवशी त्यांना जनतेची सेवा करण्याची नवी जबाबदारी मिळाली याची आठवण करुन देत आजची तारीख  त्यांच्यासाठी महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.  लोकांची सेवा करण्याचा, लोकांमध्ये राहण्याचा त्यांचा प्रवास अनेक दशकांपासून सुरू होता, परंतु आजपासून 20 वर्षांपूर्वी त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नवीन जबाबदारी मिळाली.  या प्रवासाची सुरुवात उत्तराखंड राज्याच्या निर्मितीशीही संबंधित आहे.  कारण काही महिन्यांनंतर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला असे  ते म्हणाले. त्यांनी कधीही कल्पना केली नव्हती की, ते लोकांच्या आशीर्वादाने पंतप्रधानपदापर्यंत पोहोचतील असेही त्यांनी सांगितले.  सरकारचे प्रमुख म्हणून या अखंड प्रवासाच्या 21 व्या वर्षात प्रवेश करतानाच पंतप्रधानांनी देश आणि उत्तराखंडच्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

जिथे योग आणि आयुर्वेद यासारख्या जीवनदायी शक्तींना सामर्थ्य प्राप्त झाले, तिथे आज ऑक्सिजन प्रकल्प समर्पित केला जात असल्याबद्दल श्री मोदी यांनी आनंद व्यक्त केला. कोरोना महामारीशी लढण्यासाठी भारताने इतक्या कमी कालावधीत उभारलेल्या सुविधा आपल्या देशाची क्षमता दर्शवतात.  महामारीच्या आधी, फक्त 1 चाचणी प्रयोगशाळा होती तिथपासून ते आता सुमारे 3000 चाचणी प्रयोगशाळांचे उभारले गेले.  भारताचा प्रवास, मास्क आणि किट्सचा आयातदार ते निर्यातदार असा झाला आहे.  देशातील दुर्गम भागातही नवीन व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.  भारताने मेड इन इंडिया कोरोना लसीचे जलद आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले आहे.  भारताने जगातील सर्वात मोठी आणि वेगवान लसीकरण मोहीम राबवली आहे असे  पंतप्रधान म्हणाले.  भारताने जे केले आहे ते आपल्या दृढनिश्चयाचे, आपल्या सेवेचे आणि आमच्या एकतेचे प्रतीक आहे असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, सामान्यत: भारत दररोज 900 मेट्रिक टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजन तयार करत असे.  मागणी वाढली तसे भारताने वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन 10 पटीने वाढवले.  ते पुढे म्हणाले की, जगातील कोणत्याही देशासाठी हे अकल्पनीय ध्येय होते, परंतु भारताने ते साध्य केले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीच्या 93 कोटी मात्रा दिल्या गेल्या आहेत ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.  लवकरच भारत 100 कोटींचा आकडा पार करेल असे  ते म्हणाले. भारताने कोविन व्यासपीठ तयार करून  इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण कसे केले जाते हे संपूर्ण जगाला दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिक त्यांच्या समस्या घेऊन येतील मग कारवाई करु अशी वाट आता सरकार पाहत नाही.  हा गैरसमज सरकारी मानसिकता आणि यंत्रणेतून दूर केला जात आहे.  आता सरकार नागरिकांकडे जाते.

6-7 वर्षांपूर्वीपर्यंत केवळ काही राज्यांमध्ये एम्सची सुविधा होती, आज प्रत्येक राज्यात एम्स पोहचवण्याचे काम केले जात आहे.   एम्सचे मजबूत जाळे तयार करण्यासाठी आम्ही 6 एम्सपासून 22 एम्सपर्यंत वेगाने पुढे जात आहोत असे ते म्हणाले.  देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे हे सरकारचे ध्येय आहे.  माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी उत्तराखंडच्या निर्मितीचे स्वप्न पूर्ण केले होते याची आठवण त्यांनी करुन दिली.  श्री अटलबिहारी वाजपेयी यांचा विश्वास होता की कनेक्टिव्हिटी अर्थात संपर्काचा थेट विकासाशी संबंध आहे.  त्यांच्या प्रेरणेमुळे आज देशातील कनेक्टिव्हिटी अर्थात संपर्क पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व प्रमाणावर आणि वेगाने सुधारणा करण्याचे काम केले जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

2019 मध्ये जल जीवन मिशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान म्हणाले, उत्तराखंडमधील केवळ 1,30,000 घरांना नळाचे पाणी उपलब्ध होते.  आज पाईपद्वारे 7,10,000 हून अधिक घरांमध्ये पोहोचू लागले आहे.  म्हणजेच, केवळ 2 वर्षांच्या आत, राज्यातील सुमारे 6 लाख घरांना पाणी जोडणी मिळाली आहे. सरकार प्रत्येक सैनिक, प्रत्येक माजी सैनिकांच्या हितासाठी खूप गंभीरपणे काम करत आहे,  आमच्या सरकारनेच वन रँक वन पेन्शन लागू करून सशस्त्र दलाच्या बांधवांची 40 वर्षे जुनी मागणी पूर्ण केली अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

अमरावती जिल्ह्यात प्रतिदिन70मे. टन ऑक्सिजन उपलब्ध

अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील ऑक्सिजनची मागणी 23 मे. टन पर्यंत पोहोचली होती. हे लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचे उत्पादन तिप्पट वाढविण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात आजमितीला प्रतिदिन 70 मे. टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. पीएम केअर फंडातून ‘एल अँड टी’ आणि ‘डीआरडीओ’ यांच्या सहयोगातून हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यात  17 पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे  नियोजन असून, त्यातील 3 प्रकल्प पीएम केअर फंडातून उभारण्यात येत आहे. त्यात अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील प्रकल्प  1 हजार एलपीएम क्षमतेचा आहे. दुसरा प्रकल्प मोझरी येथील आयुर्वेद रुग्णालय येथे असून, त्याची क्षमता 1 हजार एलपीएम आहे. तिसरा प्लांट दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात असून त्याची क्षमता 200 एलपीएम आहे. कार्यक्रमानंतर खासदार श्री. तडस, खासदार श्रीमती राणा, आमदार श्री. तडस, जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी प्रकल्पाची पाहणी केली व वैद्यकीय अधिकारी, तसेच तंत्रज्ञांशी चर्चा केली.