राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुंबई ,७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे सुरक्षेचे नियम पाळून आजपासून सुरु करण्यात आली आहेत. याच निमित्ताने पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दादर येथील चैत्यभूमीला आज सकाळी भेट दिली, आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

यावेळी श्री. बनसोडे यांच्यासह भारतीय बौद्ध महासंघ आणि समता सैनिक दलाचे प्रतिनिधी प्रदिप कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे नागसेन कांबळे, शिरीष चिकलकर, सुबोध भारत, सुनील बनसोडे, रामदास शिंदे, सतीश सुर्यवंशी उपस्थित होते.

श्री.बनसोडे यावेळी म्हणाले की, कोविड विषाणूचा धोका अधिक होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व प्रार्थना स्थळे बंद ठेवण्यात आली होती.आजपासून प्रार्थनास्थळे भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आली असली तरी भक्तांनी आवश्यक ती खबरदारी घेत राज्य शासनाला सहकार्य करावे.कोविडचा धोका अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्याने तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.