स्टॅम्प पेपरसाठी अडवणूक होत असल्यास मुद्रांक, नोंदणी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

औरंगाबाद,५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- प्रतिज्ञापत्र करताना स्टॅम्प पेपरसाठी अडवणूक करण्यात येत असेल, तर मुद्रांक आणि नोंदणी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दीपक सोनवणे यांनी केले.

स्टॅम्प पेपर मिळत नसल्यामुळे कागदपत्रे मिळविण्यात आणि प्रवेशाच्या प्रक्रियेत अडचणी येत असल्याच्या तक्रारी, प्रवेशासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रांसाठी वापरण्यात येणारे दहा किंवा वीस रुपयांचे स्टॅम्प पेपर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची दखल घेत शासनाने 01 जुलै 2004 ला अधिसूचनेद्वारे  जात, उत्पन्न, वास्तव्य, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, शासकीय कार्यालय व न्यायालये यांच्यासमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकाराच्या प्रतिज्ञापत्रांवर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे. विविध कागदपत्रांसाठी साध्या कोऱ्या कागदावर केलेला अर्ज मंजूर करणे बंधनकारक आहे.  मात्र, अर्जदाराकडे आवश्यक ती कागदपत्रे आणि पुरावे असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी कळविलेले आहे.