राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड

खुलताबाद ,४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत आहे. राज्य सरकारने  ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांना मदत करावी. शेतात पाणी आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. हा विषय केंद्र सरकारकडे मांडणार आहे. केंद्रीय पथक लवकरच नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती  केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी खुलताबाद येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 


अतिवृष्टीमुळे तसेच मुसळधार पावसाने घातलेल्या थैमानामुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी तालुक्यातील सराई शिवारात बैलगाडीवर स्वार होऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल जी गायकवाड, पंचायत समितीचे सभापती गणेश अधाने, उपसभापती युवराज नागे, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहाद्दूर, पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे, मंडळ कृषी अधिकारी विजय नरवाडे, वैशाली पवार,  माजी सभापती भीमराव खंडागळे, दिनेश अंभोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, जिल्हा सरचिटणीस संजय खंबायते, महेश माळवतकर, तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, शहराध्यक्ष सतीश दांडेकर, नगरसेवक नवनाथ बारगळ,  परसराम बारगळ, योगेश बारगळ, ज्ञानेश्वर बारगळ, संदीप निकम, विकास कापसे, अमोल गवळी उपस्थित होते.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी सोमवारी सकाळी नऊ वाजता सराई गाव गाठले. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ कराड आपल्या गावात आल्याचे कळताच शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. नुकसानग्रस्त पिकांची पाहणीसाठी शेतात जाणाऱ्या रस्त्यावर चिखल साचलेला होता. आता केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड रस्त्यावर उभे राहून पाहणीचा फार्स करतील आणि निघून जातील असे सराई येथील ग्रामस्थांना वाटले. परंतु कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर द्यायचा. त्यांची व्यथा समजावून घेत त्यांना काही मदत करता येते का या जिद्दीने केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी स्वतः बैलगाडीतून शेत गाठले. यावेळी त्यांनी जेष्ठ शेतकरी युवराज नागे यांच्याशी संवाद साधला. यावेळी शेतकरी युवराज नागे यांनी सांगितले की चार महिन्यांचे पीक उध्वस्त झाले आहे. विहिरी पडल्या. नाले वाहून गेले. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्ण नागवला आहे. पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी.

सराई परिसरातील शेतकऱ्यांची पिके अतिपावसामुळे पाण्यात गेली आहे. कापूस, मका, सोयाबीन, आद्रक, भुईमूग , भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून पावसामुळे हाताशी  काढणीस आलेले पिके पावसामुळे हिरावली आहेत. एकीकडे पिकांचे नुकसान झालेले असतांना महाराष्ट्र बँकेकडून पीककर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. बँकेने शेतकऱ्यांचे बचत खाते होल्ड केलेले असल्यामुळे सालुखेडा येथील शेतकरी अण्णा हनुमंता काळे यांनी शासनाने आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.