शेतकऱ्यांनो, कितीही नैसर्गिक संकट येऊ द्या आत्महत्या करू नका – निवृत्ती महाराज इंदुरीकर

वर्षांनंतर लोक खळखळून हसले ! 

खुलताबाद ,४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- शेतकऱ्यांनो कितीही नैसर्गिक संकट येऊ द्या. आत्महत्या करू नका, असे आवाहन सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केले. काटशेवरी फाटा गदाना येथील लक्की ट्रेकिंग कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कीर्तनातून त्यांनी समाजप्रबोधन केले. सुरुवातीला अमजद खान पठाण यांनी इंदुरीकर महाराजांचे स्वागत केले. 
 व्यासपीठावर अमजद खान पठाण, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू वरकड, संपत छाजेड,  कृष्णा पाटील डोणगावकर उपस्थित होते. 


यावेळी बोलताना कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तब्बल दीड वर्षांनी कीर्तनाचा योग आल्याचे सांगून तुकाराम महाराजांच्या चार हजार ९२ अभांगापैकी संत बळ हा अभंग घेऊन समाजप्रबोधन केले. कीर्तनाच्या सुरुवातीला दुसऱ्या लाटेत  आपले थोडेतरी पुण्य आहे म्हणून वाचलो. खोकलला का ठोकला. अशी परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांनी खोकला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्याला प्रत्येकाला जवळचा नातेवाईक, मित्र करोनामध्ये गमवावा लागला. वारकऱ्यांची, आईवडिलांची सेवा केली तर फळ मिळते. पैसा, संपत्ती, सत्ता, मित्र कामाला येत नाही. हे करोनाने दाखवून दिले आहे. चांगले कर्म केले तर त्याचे चांगले फळ मिळते. करोनावर एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. घाबरू नका. करोना बाधिताना वाळीत टाकू नका. करोना मध्ये माणसाला आधाराची गरज आहे. करोनाची भीती कमी झाली पाहिजे. लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांवर कुठलाच परिणाम झाला नाही. शेतकरी राजाच आहे. आपण स्वतः दीड वर्ष शेती केली. शेतकऱ्यांनी शेततळे करावे. ठिबकद्वारे कमी वेळात शेती करावी. शेती करतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. शेतीला जोडधंदा करा.सेंद्रिय शेती करा.शेतकऱ्यांनी चांगली शेती केली तर यशस्वी होताल असे सांगून दिड वर्ष शाळा बंद असल्याने मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू करण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. ऑनलाईन क्लासेस मुळे सतत मोबाईलवर असलेल्या  अनेक मुलांचे डोळे गेले. जाड भिंगाचा चष्मा लागला. कंबर दुखी झाली. मेंदूवर ताण पडला. मित्र राहिले नाही.संवाद राहिला नाही.मुलांचा स्वभाव चिडचिडा झाला. असे सांगून एका मुलाला तू  कोणत्या वर्गात आहे असे विचारले असता त्याने सातवी सांगितले. गेल्यावर्षी शाळेत गेला होता. असा प्रश्न विचारला तर त्याने नाही असे उत्तर दिले. घड्याळात काटे किती विचारले असता त्याने बारा असे उत्तर देताच इंदुरीकर महाराज यांनी अलिकडे गाजलेले गाणे कोणते असे विचारताच त्या मुलाने ओ शेठ! असे उत्तर देताच हशा पिकला. मोबाईलचा वापर कमी करा. क्लिप करणे बंद करा.शाळेत जा.अभ्यास करून मोठे व्हा असे आवाहन त्यांनी केले.

कृष्णा पाटील डोणगावकर यांनी आभार मानले. तब्बल दिड वर्षांनंतर लोक खळखळून हसले.
कीर्तन सेवा घेणारे अमजद खान हे खरोखरच लकी आहेत.त्यांच्या कंपनीचे नावही लकी आहे. आज पाऊस पडला नाही म्हणून देखील लकी आहे. नोकरीच्या शोधात न राहता व्यवसायिक व्हा. व्यवसायात नम्रपणा असावा.सचोटीने व्यवसाय करावा.असे   इंदुरीकर महाराज यांनी सांगितले.