वैजापूर तालुक्यात 86 हजार हेक्टर पिकांचे नुकसान, तर 190 घरांची पडझड, प्रशासनाचा प्राथमिक अंदाज

वैजापूर ,३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-अतिवृष्टी व पुरामुळे वैजापूर तालुक्यात शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले असून,प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यातील 86 हजार म्हणजेच 70 टक्क्यांपेक्ष जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. जवळपास 190 घरांची पडझड झाली तर नदीकाठच्या 39 गावांतील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार राहुल गायकवाड यांनी दिली.

अतिवृष्टी व पुराचा नदीकाठच्या गावांना फटका बसला असून, पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्यामुले शेतकरी हतबल झाला आहे.तालुक्यात 27 व 28 सप्टेंबर रोजी सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाल्यामुळे शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पासह बोर-दहेगाव, ढेकू, मन्याड,कोल्ही आदी धरणे पूर्ण क्षमतेने भरली तर छोटे मोठे बंधारे ओसंडून वाहू लागल्यामुळे त्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.

पाणी विसर्ग करण्यात आल्यामुळे नद्या नाल्यांना पूर येऊन नदीकाठच्या गावांना त्याचा फटका बसला.शेतातील उभी पिके वाहून गेली.कापूस, सोयाबीन, मका कांदा या खरीप पिकांचे नुकसान झाले.पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे लासुर व गारजया दोन महसूल मंडळातील जवळपास 190 कच्या घरांची पडझड झाली असून, यामध्ये 25 घरे पूर्ण तर 175 घरांची अंशतः पडझड झाली आहे. याशिवाय नदीकाठच्या 39 गावांतील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे तब्बल 1 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.लासुर व गारज मंडळात जास्त पाऊस झाल्यामुळे या मंडळातील गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या महसूल मंडळातील गावांमधील 567 कुटुंबातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.नारंगी नदीकाठच्या गावांनाही पुराचा तडाखा बसला असून,  या भागातील पुरणगांव,डवाळा,खंबाळा,भऊर,किरतपुर,नारायणपूर तसेच वैजापूर शहरालगतच्या दत्तवाडी भागातील शेतकरी व ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे.वैजापूर तालुक्यात या खरीप हंगामात एकूण 1 लाख 29 हजार 234 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्यात आली होती.अतिवृष्टी व पुरामुळे  तब्बल 86 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे यामध्ये कपाशीसह सोयाबीन, मका,कांदे व अन्य खरीप पिकांचा समावेश आहे. प्रशासनाने हा प्राथमिक अंदाज वर्तविला असून,पंचनामे पूर्ण झातयानंतर नेमके नुकसान किती झाले हे स्पष्ट होईल.