भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने लसींच्या 90 कोटी मात्रांचा टप्पा पार केला

गेल्या 24 तासांत, लसीच्या 73 लाख 76 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

सध्याचा रोगमुक्ती दर 97.87% आहे; मार्च 2020 पासूनचा उच्चांकी दर

गेल्या 24 तासांत देशात 22,842 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या (2,70,557) एकूण बाधितांच्या संख्येच्या 0.80%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.66%) गेले 100 दिवस 3% पेक्षा कमी

नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या  तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 73,76,846 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 90 कोटी मात्रांचा  (90,51,75,348) टप्पा पार केला आहे.एकूण  87,84,333 सत्रांतून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

गेल्या 24 तासांत 25,930 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या  3,30,94,529 झाली आहे.परिणामी, सध्या, भारतातील रोगमुक्ती दर 97.87% आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा उच्चांकी रोगमुक्ती दर आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग 98 दिवस नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.गेल्या 24 तासांत, 22,842 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 2,70,557 इतकी आहे आणि ही गेल्या 199 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.80% आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 12,65,734 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 57 कोटी 32 लाखांहून अधिक (57,32,60,724) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.66% असून गेले 100 दिवस हा दर 3% हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 1.80% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 34 दिवस 3% हून कमी आहे आणि आता गेले सलग 117  दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे