फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पंजाब दौऱ्यावर; फलोत्पादन शेती व प्रक्रिया उद्योगाची पाहणी करणार

मुंबई ,३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पंजाबमधील फलोत्पादन शेती आणि फळप्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करण्यासाठी आजपासून पंजाब दौऱ्यावर आहेत. राज्यातील फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना नव्या तंत्राची माहिती व्हावी, यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मंत्री श्री. भुमरे यांच्यासोबत फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोटे, फळ उत्पादक शेतकरी नंदलाल काळे, फलोत्पादन तज्ज्ञ भगवानराव कापसे, वसंत बिनवडे, संदीप शिरसाठ, मनोज वानखेडे, सिद्धार्थ गायकवाड यांचाही समावेश आहे.

श्री. भुमरे उद्या (दि.4) पंजाबमधील विविध भागात फळपीक आणि फळप्रक्रिया उद्योगाची पाहणी करणार आहेत. यामध्ये विशेषतः सिट्रस क्लस्टरची पाहणी महत्त्वाची आहे. याबरोबरच मंगळवारी (दि.5) श्री. भुमरे यांची पंजाबचे कृषी मंत्री यांच्या सोबत बैठक आहे. राज्यासह मराठवाड्यातील फलोत्पादन विकसित करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर या दौऱ्यात विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.