अतिवृष्टीग्रस्त भागातील पीक पाहणीसाठी आ.सतीश चव्हाण शेतकर्‍यांच्या बांधावर

नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार

औरंगाबाद,२ऑक्टोबर /प्रतिनिधी :- गुलाब चक्रीवादळामुळे पैठण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आ.सतीश चव्हाण यांनी आज (दि.2)  पैठण तालुक्यात प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शासनस्तरावर पाठपूरावा करून बाधित शेतकर्‍यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगत आ.सतीश चव्हाण यांनी पैठण तालुक्यातील शेतकर्‍यांना धीर दिला.

     पैठण तालुक्यातील कापुसवाडी, बालानगर, खेर्डा, दावरवाडी, कुतबखेडा, थेरगांव, वडजी, विहामांडवा, नवगांव, हिरडपूरी आदी गावांना आज आ.सतीश चव्हाण यांनी भेटी देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी केली. पाहणीनंतर आ.सतीश चव्हाण यांनी दावरवाडी येथे तहसलीदार चंद्रकांत शेळके यांच्यासह संबंधित अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली.

पैठण तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने खरीप पिके पाण्याखाली गेली असून शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कपाशी, मका, उस, मोसंबी ही पिके आडवी झाली आहेत. अजूनही शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून पिके पवळी पडत आहेत. अनेक घरांची पडझड झाली असून नागरिकांच्या जीवनाआवश्यक वस्तुंचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुकास्तरावरून आपल्या निकषात बसणार्‍या विविध माध्यमातून शेतकरी, नागरिकांना त्वरीत आवश्यक ती मदत करावी, एकही बाधित शेतकरी, व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

     याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, संजय वाघचौरे, दत्ता गोर्डे, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पाटील निर्मळ, युवकचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, पी.आर.थोटे, अविनाश राठोड, रमेश इंगळे, गोपीनाथ गोर्डे, संजय कोरडे, सरपंच बाबासाहेब ढोले, तुकाराम इंगळे, प्रभाकर तांबे, मुनीर पटेल, विशाल शेळके आदींची उपस्थिती होती.