शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, बोरसर येथे शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

वैजापूर ,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-अतिवृष्टीमुळे वैजापूर तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून,आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडण्यासाठी बोरसर येथे शुक्रवारी शिवक्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसह अर्धनग्न आंदोलन केले.

दररोजच्या पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके पाण्यात वाहून गेली असून, आर्थिक अडचणीत शेतकरी वर्ग सापडला आहे.शासनाने शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी,जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, महसूल प्रशासनातर्फे अद्याप शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाही तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे,शेतकऱ्यांचे पीक कर्ज व वीज बील माफ करावे आदी मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या.

बोरसर येथील शेतकरी रमेशअण्णा पवार यांच्या शेतात करण्यात आलेल्या या अर्धनग्न आंदोलनात सुनील बोडखे,सोमनाथ मगर,जालिंदर पवार,नानासाहेब पवार यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.