अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यात ३५७ कोटींचे नुकसान

चार लाख ९२८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान,७४० किलोमीटर रस्त्यांचे नुकसान 

आपत्तीग्रस्तांना भरीव मदत देणारः सुभाष देसाई

औरंगाबाद,१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-औरंगाबाद,जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना राज्य शासन चौकटीबाहेर जावून भरीव मदत करेल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.

Image


औरंगाबाद, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आज पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ऑनलाइन आढावा घेतला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार आंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके आदी उपस्थित होते.  
 यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी एकूण परिस्थितिचा अहवाल सादर केला. जिल्ह्यात यावर्षी एकूण सरासरीच्या ​दीडपट ​ पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे सुमारे चार लाख ९२८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. अनेक घरांचे नुकसान झाले आहे. शाळा, रस्ते, लघु, मध्यम बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आपत्तीमध्ये १४ जणांचे प्राण गेले आहेत. तर सुमारे ७४० किलोमीटर रस्त्यांचे नुकसान झाले. १७ तलाव फुटले. २१ कोल्हापुरी बंधारे वाहून गेले आहेत. एकूण जिल्ह्यात ३५७ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यावर मोठे संकट कोसळले आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रशासनाला तातडीची मदत देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार मदतीचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, नुकसानाचा आकडा मोठा असून प्रचलित नियमांच्या बाहेर जावून राज्य शासन सर्व आपत्तीग्रस्तांना भरीव मदत करेल. यासाठी मदत पुनर्वसन तसेच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल, असे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. लवकरच विमा कंपन्यांसोबत बैठक घेऊन भरपाईबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. देसाई म्हणाले.

 यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे,आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, मीनाताई शेळके आदी लोकप्रतिनिधींनी सूचना केल्या.